काँग्रेसचे पानिपत करून ‘शत-प्रतिशत’ भाजपला विजय मिळवून देणारे नरेंद्र मोदी येत्या सोमवारी रोजी पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. मोदींच्या शपथविधीची जोरदार तयारी राष्ट्रपती भवनात सुरू झाली आहे. भारतीय जनता पक्षाच्या नवनिर्वाचित सदस्यांच्या बैठकीत नरेंद्र मोदींची संसदीय पक्षनेतेपदी निवड करण्यात आली. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी नरेंद्र मोदी यांना सत्तास्थापनेसाठी निमंत्रण दिले आहे.
लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर दिल्लीत केवळ ‘नमो-नमो’ सुरू आहे. त्याचीच प्रचीती आज संसद परिसरात आली. संसदेत प्रवेश करण्यापूर्वी मोदींना पायऱ्यांवर कपाळ टेकवून नमन केले. भाजप नेत्यांनी त्यांचे जंगी स्वागत केले. सेंट्रल हॉलमध्ये मोदींचेच गारूड होते.  मोदींच्या आगमनानंतर सेंट्रल हॉलमधील भाजप सदस्यांनी उठून त्यांचे स्वागत केले. ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी संसदीय पक्ष नेतेपदासाठी मोदींच्या नावाची शिफारस केली.
त्यास ज्येष्ठ नेते डॉ. मुरली मनोहर जोशी, माजी अध्यक्ष वेंकय्या नायडू, लोकसभेतील विरोधी पक्षनेत्या सुषमा स्वराज, राज्यसभेतील विरोधी पक्षनेते अरुण जेटली, थावरचंद गहलोत, मुख्तार अब्बास नकवी यांनी अनुमोदन दिले. .भाजप खासदार व रालोआची स्वतंत्र बैठक आटोपून मोदींच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची भेट घेतली. भेटीदरम्यान नरेंद्र मोदी यांनी सत्तास्थापनेचा दावा केला. पंतप्रधानपदाच्या शपथविधीसाठी सोमवारचा मुहूर्त निश्चित करण्यात आला आहे. सायंकाळी सहा वाजता शपथविधी सोहळा होईल. राजनाथ सिंह म्हणाले की, नरेंद्र मोदी यांनी २६ तारखेला शपथ देण्याची विनंती राष्ट्रपतींना केली.
रालोआच्या घटक पक्षांनी मोदींना पाठिंब्याचे पत्र दिले आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी अद्याप पत्र दिले नसले तरी ते उद्या आपले पत्र राष्ट्रपतींना सादर करणार आहेत. शपथविधी सोहळ्यासाठी ३ हजार पाहुण्यांना निमंत्रण धाडण्यात येईल, असे राजनाथ सिंह म्हणाले.

लोकशाहीच्या मंदिरी नतमस्तक
तीन वेळा गुजरातचे मुख्यमंत्रीपद भूषविणारे नरेंद्र मोदी मंगळवारी प्रथमच लोकसभेत प्रवेश करते झाले. जगातील सर्वात मोठय़ा लोकशाहीच्या मंदिरात प्रवेशताना मोदी लोकसभेच्या पायऱ्यांवर नतमस्तक झाले. संसदेच्या प्रांगणात मोदींचे आगमन होताच भाजप नेत्यांनी त्यांचे स्वागत केले. त्या स्वागताचा स्वीकार करीत मोदी लोकसभेच्या प्रवेशद्वारापाशी आले. तिथे पायऱ्यांना स्पर्श करत त्यांनी माथा टेकला. ‘माझ्या आयुष्यात अनेक प्रसंग प्रथमच आले. गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्यापूर्वी कधीही मी मुख्यमंत्र्यांच्या चेंबरमध्ये गेलो नव्हतो. ज्या निवडणुकीमुळे मला मुख्यमंत्रीपद मिळाले ती माझ्या आयुष्यातील पहिलीच विधानसभा निवडणूक होती. त्यामुळे विधानसभेच्या सभागृहात जाण्याचीही पहिलीच वेळ होती. आणि आताही संसदेत प्रवेश घेताना माझ्यावर पंतप्रधानपदाची जबाबदारी असेल’, असे मोदींनी भावपूर्ण शब्दांत नमूद केले.

अडवाणी गहिवरले..
भाजपच्या इतिहासात संपूर्ण एकहाती बहुमत आणणे ही नरेंद्र मोदींची कृपा आहे. माझ्यासारख्या नेत्याला हा दिवस पाहण्यास मिळणे हा भाग्याचा क्षण आहे, अशा शब्दांत ज्येष्ठ भाजप नेते लालकृष्ण अडवाणी यांनी आपल्या भावना व्यक्त केला. पंतप्रधानपदासाठी तसेच रालोआच्या संसदीय नेतेपदी नरेंद्र मोदी यांचे नाव सुचविताना ते बोलत होते. आपल्या भावना व्यक्त करताना अडवाणी यांना अश्रू आवरले नाहीत.

भाजप नेत्यांकडून आशावाद आणि बांधीलकीची हमी
१६ व्या लोकसभेत घसघशीत बहुमत मिळाल्यानंतर राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या संसदीय नेत्याची निवड करण्यासाठी मंगळवारी संसदेच्या ऐतिहासिक मध्यवर्ती सभागृहात आघाडीच्या सर्व घटक पक्षांची बैठक झाली. भव्य यशाने गहिवरलेले अडवाणी, ‘कृपा’ शब्दाने भावुक झालेले मोदी, मोदींच्या समयोचित भाषणाने भारावलेले नेत, विजयाचा आनंद, जबाबदारीची जाणिवे आणि काही क्षणी डोळ्यांतून तरळलेले अश्रू अशा संमिश्र भावनांचे हिंदोळे सभागृहाने अनुभवले.उत्तर प्रदेशात ८० पैकी तब्बल ७३ जागांवर विजयश्री मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे भाजपचे प्रभारी अमित शहा यांच्यावरही संसदेच्या मध्यवर्ती सभागृहात अभिनंदनाचा वर्षांव करण्यात आला. मोदी यांचे अभिनंदन करण्यापूर्वी रालोआतील घटक पक्षाच्या अनेक नेत्यांनी शहा यांचे अभिनंदन केले.