अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी करण्यात आलेल्या घोषणा म्हणजे शेतकऱ्यांचा अपमान आहे. मोदी सरकारने श्रीमंतांसाठी खूप पैसे दिले मात्र, शेतकऱ्यांना केवळ १७ रुपयेच दिले. एका शेतकऱ्याला तर साडेतीन रुपये देऊन पंतप्रधानांनी संसदेत टाळ्याही वाजवून घेतल्या, अशा शब्दांत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी अर्थसंकल्पाच्या अनुषंगाने पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला.

बिहारमधील पाटणा येथे २८ वर्षांनंतर झालेल्या काँग्रेसच्या सभेत ते बोलत होते. या ऐतिहासिक सभेच्या आयोजनाबद्दल त्यांनी बिहारमधील काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले. तसेच आता हे निश्चित झाले की, बिहारमध्ये काँग्रेसची सत्ता येणार आहे, अशा शब्दांत त्यांनी कार्यकर्त्यांना प्रोत्साहित केले.

मोदींनी आपल्या श्रीमंत मित्रांचा काळा पैसा सफेद केला. शेतकऱ्यांना दिवसाला १७ रुपये देऊन त्यांचा अपमान केला. नोटाबंदी जगातला सर्वांत मोठा घोटाळा आहे. मोदींप्रमाणेच नितीशकुमारही मोठ मोठे वायदे करण्यात पटाईत आहेत, अशा शब्दांत त्यांनी मोदींवर चौफेर टीका केली. तसेच जर केंद्रात काँग्रेसची सत्ता आली तर पाटणा विद्यापीठाला केंद्रीय विद्यापीठाचा दर्जा दिला जाईल, अशी घोषणाही त्यांनी यावेळी केली.

राहुल म्हणाले, बिहारमध्येही आम्ही फ्रन्ट फूटवर खेळणार आहोत. आम्ही नरेंद्र मोदींसाऱखे राजकारण करीत नाही. आम्ही ठरवलं तर ऐतिहासिक काम करतो. मोदींनी पाच वर्षांत अरबपतींना करोडो रुपये दिले. पैशाची काहीच कमी नाही, त्यांना जे वाटतं ते होऊन जातं. त्याचवेळी देशाची गरीब जनता केवळ पहातच राहते. मात्र, काँग्रेसचे सरकाल आले तर प्रत्येक गरीब व्यक्तीला किमान वेतनाची गॅरंटी देतो, असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.