कृषी विधेयकांवरून राज्यसभेत सुरू झालेले राजकीय नाट्य अद्यापही सुरूच आहे. काँग्रेससह विरोधी पक्षांकडून या विधेयकांचा जोरदार विरोध केला जात आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज पंतप्रधान मोदींवर यावरून निशाणा साधला आहे. मोदींनी शेतकऱ्यांना समुळ नष्ट करून, श्रीमंत मित्रांचा मोठा विकास केला असल्याची टीका राहुल गांधी यांनी केली आहे.

राहुल गांधी यांनी टीका करताना पंतप्रधान मोदींनी २०१४ मधील निवडणुक कालावधीत दिलेल्या आश्वासनाची आठवण करून दिली आहे. शिवाय, २०१५ मध्ये ते आश्वासन पूर्ण होणार नसल्याचे मोदी सरकारने न्यायालयात सांगितल्याचे देखील म्हटले आहे. त्यानंतर २०२० मध्ये काळा शेतकरी कायदा आणल्याचे राहुल गांधी म्हणत आहेत.

आणखी वाचा- राज्यसभेच्या कामकाजावर विरोधकांचा बहिष्कार, खासदारांचं निलंबन रद्द करण्याची मागणी

२०१४- मोदीजींचे निवडणुकीचे आश्वासन स्वामीनाथन आयोगाचा MSP
२०१५- मोदी सरकारने न्यायालयात सांगितले की हे त्यांच्याकडून होणार नाही.
२०२० – काळा शेतकरी कायदा
“ मोदीजींचा हेतू ‘स्वच्छ’ कृषीविरोधी नवा प्रयत्न, शेतकऱ्यांना करून समुळ नष्ट, श्रीमंत मित्रांचा मोठा विकास ” असे राहुल गांधी यांनी ट्वटिमध्ये म्हटले आहे.

आणखी वाचा- राज्यसभेतील गोंधळामुळे उपसभापती हरिवंश यांचा एकदिवसीय उपोषणाचा निर्णय

दरम्यान, राज्यसभेत गोंधळ घातल्याने आठ खासदारांवर निलंबनाची कारवाई करण्यात आल्याने विरोधक आक्रमक झाले आहेत. जोपर्यंत निलंबन मागे घेतलं जात नाही तोपर्यंत राज्यसभेच्या कामकाजावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांनी सभागृहात बोलताना ही माहिती दिली. तर, सभापती व्यंकय्या नायडू यांनी विरोधी पक्षांना आपल्या निर्णयावर फेरविचार करण्याची विनंती केलेली आहे.