कारगिल विजय दिनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ‘मन की बात’मधून देशवासियांशी संवाद साधताना कारगिल युद्धातील जवानांची आठवण ठेवण्याचे आवाहन केले. त्याचबरोबर वीर जवानांच्या शौर्याबद्दल अधिक माहितीसाठी gallantryawards.gov.in या सरकारी वेबसाईटला भेट देण्याचे आवाहनही केले.

मोदी म्हणाले, “मी तुम्हाला आग्रह करतो की, gallantryawards.gov.in या वेबसाईटला तुम्ही जरुर भेट द्या. या वेबसाईटवर तुम्हाला आपल्या वीर पराक्रमी योद्ध्यांची आणि त्यांच्या पराक्रमाची अधिकाधिक माहिती मिळू शकेल. ही माहितीवर तुम्ही आपल्या सहकार्यांसोबत चर्चा करा. त्यामुळे त्यांच्यासाठी ते प्रेरणास्थानही बनेल. आपण जरुर या वेबसाईटला भेट द्या मी तर म्हणेन वारंवार भेट द्या”

कारगिल युद्धादरम्यान, तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी लाल किल्ल्यावरुन केलेल्या भाषणाची यावेळी मोदींनी आठवण करुन दिली. ते म्हणाले, अटलजींनी कारगिल युद्धावेळी लाल किल्ल्यावरुन जे म्हटलं होतं ते आजही आपल्या सर्वांसाठी प्रासंगिक आहे. अटलजींनी त्यावेळी देशाला गांधीजींच्या एका मंत्राची आठवण करुन दिली होती. महात्मा गांधींचा मंत्र होता की, जर कोणाला कधी आपण काय करावं किंवा करु नये हे समजत नसेल तर त्याने भारतातील सर्वात गरीब आणि असहाय्य व्यक्तीबाबत विचार करायला हवा. आपल्या कृतीमुळं या गरीब व्यक्तीचं भलं होईल की नाही याचा त्यानं विचार करायला हवा.