गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना पंतप्रधानपदाचे उमेदवार जाहीर करून भाजपने आपण रा. स्व. संघ परिवाराच्या दबावाला बळी पडल्याचे सिद्ध केले आहे, असे काँग्रेसचे सरचिटणीस दिग्विजय सिंग यांनी म्हटले आहे. असे असले तरी रा. स्व. संघ अद्यापही स्वत:ला सांस्कृतिक संघटना म्हणवून घेत आहे, याबाबत दिग्विजय सिंग यांनी आश्चर्य व्यक्त केले.
रा. स्व. संघ आणि योगगुरू बाबा रामदेव यांच्या दबावाला बळी पडून भाजपने नरेंद्र मोदी यांचे नाव पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून घोषित केले. असे असताना आपण अद्यापि रा. स्व. संघाला सांस्कृतिक संघटना म्हणणार का, असा सवालही सिंग यांनी ट्विटरवर केला आहे.
भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांचा विरोध डावलून मोदी यांची उमेदवारी जाहीर करण्यामागे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथ सिंग यांचे कारस्थान असल्याचे संकेत काँग्रेसचे शकील अहमद यांनी दिले आहेत. लोकसभेतील विरोधी पक्षनेत्या सुषमा स्वराज आणि अडवाणी यांना बाजूला करण्याचा हा प्रकार नाही ना, अशी शंकाही अहमद यांनी व्यक्त केली.