पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ऐतिहासिक अमेरिका दौऱ्याने भारताची क्षमता सिद्ध झाली आहे. दोन्ही देशांतील संबंध महत्त्वाचे असल्याचे त्यातून दिसून येते, असे अमेरिकी काँग्रेसच्या सदस्य व हिंदुत्वाच्या कट्टर पुरस्कर्त्यां तुलसी गॅबार्ड यांनी येथे सांगितले.
गॅबार्ड यांनी पीटीआयला सांगितले, की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची अमेरिका भेट ही ऊर्जेने ओतप्रोत भरलेले होती. त्यांची भारताविषयीची दूरदृष्टी ही अमेरिकनांना भावली. भारत व त्याच्या जनतेचे भवितव्य घडवण्यास मोदी गांभीर्याने प्रयत्न करीत आहेत हेच दिसून आले.
अमेरिकेतील व्यापार व इतर क्षेत्रांत मोदी व पर्यायाने भारताच्या क्षमतेवर शिक्कामोर्तब झाले आहे. संयुक्त क्षेत्रात काम करण्याची दोन्ही देशांची तयारी आहे. अमेरिकेतील व्यापार क्षेत्रातील अनेक नेत्यांना आपण भेटलो असून ते भारतात गुंतवणूक करण्यास इच्छुक आहेत. भारतातील उद्योगधुरीणांना आपण भेटलो असून त्यांनीही गुंतवणुकीत स्वारस्य दाखवले आहे.
गॅबार्ड यांनी या आठवडय़ात मोदींची भेट घेतली होती. त्यांच्या भेटीनंतर आपण प्रगतीसंबंधात आशावादी आहोत. त्यांच्या ‘स्वच्छ भारत’ या अभियानाने आपण भारावून गेलो आहोत असे त्या म्हणाल्या.