इजिप्तचे अध्यक्ष मोहम्मद मोर्सी यांच्या राजीनाम्याच्या मागणीचा जोर वाढत असून लष्कराने त्यांना दिलेली मुदत संपुष्टात येण्यासाठी आता काही तासांचा अवधी राहिलेला असतानाच त्यांनी राजीनाम्यास ठाम नकार दिला आहे. अध्यक्ष मोर्सी आणि लष्कराने देशासाठी प्राणांचे बलिदान देण्याची तयारी दर्शविल्याने शक्तिप्रदर्शनाची वेळ समीप येत चालली आहे.
इजिप्तमधील राजकीय पेचप्रसंग सोडविण्यासाठी लष्कराने मोर्सी यांना दिलेली ४८ तासांची मुदत हळूहळू संपुष्टात येत चालली असल्याने इजिप्तमध्ये पुन्हा एकदा लष्करी राजवट येण्याची चिन्हे दिसत आहेत. मुक्त आणि मोकळ्या वातावरणात झालेल्या निवडणुकीत लोकशाही मार्गाने आपण निवडून आलो असल्याचे स्पष्ट करून मोर्सी यांनी राजीनामा देण्यास ठाम नकार दिला आहे.
कैरो विद्यापीठाजवळ बुधवारी उडालेल्या चकमकीत १६ जण ठार झाले तर २०० हून अधिक जण जखमी झाले आहेत. अंतर्गत मंत्रालयाने लष्कराच्या बाजूने ठाम राहण्याचा निर्णय घेतला असून कोणत्याही राजकीय पक्षाला दुसऱ्यावर कुरघोडी करण्याचा वाव न देण्याचा निर्धार केला आहे.