नवी दिल्ली : गेल्या २०१० पासून यंदाच्या जूनमध्ये मोसमी पावसाने मोठी विश्रांती घेतल्यानंतर आता पुन्हा तो सक्रिय झाला आहे. या आठवडय़ात मान्सून मध्य व उत्तर भारतात पोहोचेल. हवामान खात्याच्या माहितीनुसार देशातील २५  टक्के भागात आतापर्यंत सरासरीइतका किंवा त्यापेक्षा जास्त पाऊस झाला आहे. मोसमी पाऊस पुन्हा सक्रिय झाला असून तो प्रगती करीत आहे.

मध्य भारत व उत्तर भारतात तापमानात वाढ होत असून आता तेथे दोन-तीन दिवसात पाऊस होईल, त्यामुळे दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

हवामान खात्याने सांगितले, की मोसमी पाऊसपूर्व हवामान स्थिती २७ जूनपासून वायव्य भारतात निर्माण होत आहे, असे हवामान खात्याचे अतिरिक्त संचालक मृत्युंजय मोहपात्रा यांनी सांगितले. दिल्लीत मोसमी पाऊस २९ जूनला येण्याची शक्यता असून नेहमीच या तारखेला तो येतो. २९ मे रोजी मोसमी पाऊस तीन दिवस आधीच केरळात आला. त्यानंतर केरळ, कर्नाटक, महाराष्ट्र, दक्षिण गुजरात या राज्यात पाऊस झाला आहे. एकूण मोसमी पावसाची कमतरता कालपर्यंत ऋण १० टक्के होती. चार हवामान विभागांचा विचार करता दक्षिण द्वीपकल्पात २९ टक्के जास्त पाऊस झाला आहे. पूर्व-ईशान्य तसेच वायव्य भागात २९ टक्के व २४ टक्के कमी पाऊस  झाला आहे. ३६ हवामान उपविभाग असून त्यात २४ विभागात कमी व अति कमी पाऊस झाला आहे. त्याचा अर्थ देशात २५ टक्के भागात सरासरीइतका व सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला आहे. २३ जूनपासून मोसमी पाऊस पुन्हा सक्रिय झाला. आज तो गुजरातचे सौराष्ट्र, वेरावळ, अहमदाबाद, महाराष्ट्रातील अमरावती या भागात आला आहे. पूर्वेकडे आसाम, पश्चिम बंगालमधील जलपायगुडी, दक्षिण-पश्चिम बंगालमध्ये मिदनापूर येथे पसरला आहे. उत्तर भारतीय पठारांवर २७ जूनला मान्सूनपूर्व पाऊस होण्याची शक्यता आहे. येत्या ४८ तासांत ओडिशा, पश्चिम बंगाल, गुजरात, मध्य प्रदेश या भागात मोसमी पाऊस पसरेल. पूर्व उत्तर प्रदेशव महाराष्ट्राच्या उर्वरित भागात मोसमी पाऊस होईल.