पावसाच्या परतीच्या प्रवासाला आज (२८सप्टेंबर)पासून सुरुवात झाली. नैऋत्य मोसमी पावसाचा परतीचा प्रवास राजस्थानच्या पश्चिमेस सर्वसाधारण तारखेपेक्षा ११ दिवस उशिराने सुरू झाला.

राजस्थानच्या वायव्येस सलग पाच दिवस पाऊस थांबला आणि पावसाला पूरक घटक कार्यरत नसले की त्याचा परतीचा प्रवास सुरु होतो. सर्वसाधरणपणे पावसाच्या परतीचा प्रवासाची सुरुवात ही १७ सप्टेंबरला होते. त्यानंतर महिनाभरात संपूर्ण देशातून नैऋत्य मोसमी पाऊस संपतो. यावर्षी ती ११ दिवस उशिराने झाली आहे, मात्र त्याचा परतीचा प्रवास नेहमीपेक्षा लवकर पूर्ण होण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. पुढील दोन ते तीन दिवसात राजस्थान, पंजाबच्या आणखी काही भागातून आणि दिल्ली, हरयाणा, उत्तरप्रदेश आणि मध्य प्रदेशच्या काही भागातून पावसाचा परतीचा प्रवास झाला असेल.

पावसाच्या परतीच्या प्रवासासाठी पूरक असे वातावरण तयार होत असून २८ सप्टेंबर पासून त्याचा परतीचा प्रवास सुरु होऊ शकतो, असे हवामान विभागाने या अगोदरच स्पष्ट केले होते.

राजस्थानातून वारे नैर्ऋत्येऐवजी पूर्वेकडून वाहायला लागले की पावसाचा परतीचा प्रवास सुरु होतो. राजस्थानातून हा प्रवास सुरु होतो. पूर्वेकडून वाहणाऱ्या वाऱ्याची दिशा ही परतीच्या पावसाची प्रवासाची रेषा असते. या रेषेच्या वरील भागात म्हणजे उत्तरेला पाऊस थांबतो, तर दक्षिणेला पाऊस सुरु असतो.

राजस्थानच्या वायव्येस सलग पाच दिवस पाऊस पडायचा थांबल्यानंतर आणि पावसाला पूरक असे हवामानातील घटक कार्यरत नसतील तर परतीच्या पावसाची तारीख जाहीर केली जाते. भारतीय हवामान विभागाने पावसाचे दीर्घकालीन पूर्वानुमान गुरुवारी जाहीर केले. त्यानुसार २५ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर या आठवडय़ात राजस्थानच्या वायव्येस पावसाचे प्रमाण कमी असून आठवडय़ाच्या मध्यावर नैर्ऋत्य मोसमी पावसाचा परतीचा प्रवास सुरु होण्याची शक्यता आहे. १७ सप्टेंबर ही पावसाच्या परतीचा प्रवासाची सरासरी तारीख असल्याचे हवामान विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले होते.