जम्मू-काश्मीरच्या पूंछ जिल्ह्यात शनिवारी रात्री तीव्र क्षमतेचा ग्रेनेड स्फोट झाला. या स्फोटात १० जण जखमी झाल्याचे वृत्त आहे.जखमींना नजीकच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यापैकी दोघांची प्रकृती गंभीर असल्याचे समजते.
हिजबुल मुजाहिद्दीनचा दहशतवादी बुरहान वानीच्या मृत्यूनंतर काश्मीर खोऱ्यात तणावाचे वातावरण आहे. गेल्या ३५ दिवसांपासून स्थानिक आणि भारतीय सुरक्षा यंत्रणांमध्ये संघर्ष सुरू आहे. या पार्श्वभूमीवर काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वपक्षीय बैठकही बोलावली होती. मनात असंतोष खदखदत असलेल्या काश्मीरी नागरिकांचा विश्वास आपल्याला जिंकायला पाहिजे असे आवाहन यावेळी पंतप्रधानांनी केले होते.सविस्तर माहिती थोड्याचवेळात…

दरम्यान, ‘स्वातंत्र्य दिना’निमित्त काश्मीर खो-यातील सुरक्षा अधिक कडक करण्यात आली आहे. या भागातील राष्ट्रीय महामार्गावर अतिरिक्त सुरक्षा दल तैनात करण्यात आले असून प्रत्येक वाहानांची कसून चौकशी करण्यात येत आहे. जम्मू-काश्मीर पोलीस आणि सुरक्षा दलाचा कडक बंदोबस्त प्रत्येक रस्त्यावर तैनात करण्यात आला आहे. हिज्बुल मुजाहिद्दीनचा दहशतवादी मारला गेल्यानंतर काश्मीरमधले असंतोषाचे वातावरण आहे. गेल्या महिन्यभरापासून काश्मीर खो-यातल्या अनेक भागात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. सैनिक आणि स्थानिक यांच्यामध्ये सतत चकमकी सुरू आहेत तर कुपवाडा, फुलवामा यांसारख्या भागांतून सैनिकांवर दहशतवादी हल्ले सुरू आहे. गेल्या काही महिन्यांपासून सीमेवर सुरू असलेल्या चकमकीत अनेक दहशवताद्यांना सैनिकांनी कंठस्नान घातले आहे, तर गेल्याच आठवड्यात झालेल्या दहशतवादी हल्ल्यात दोन जवान देखील शहीद झाले. काही दिवसांपूर्वी संतप्त नागरीकांनी येथील रस्ते देखील बंद केले होते, त्यामुळे अमरनाथ यात्रेवर देखील याचा परिणाम झाला होता. ‘स्वातंत्र्य दिना’दिवशी असाच प्रकार नागरिकांकडून होऊ नये म्हणून सुरक्षेच्या दृष्टीने ही खबरदारी घेण्यात आली आहे.