भारतीय सैन्यातील १५ लाख जवानांपैकी १०० हून अधिक जवानांना दरवर्षी तणावामुळे जीव गमवावा लागत असल्याची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. यंदाच्या वर्षात आतापर्यंत तणावामुळे ४४ जवानांना स्वत:ची जीवनयात्रा संपवली आहे. याशिवाय काहींचा मृत्यू सहकाऱ्यांनी केलेल्या हल्ल्यांमध्ये झाला आहे. संरक्षण मंत्रालयाने संसदेत मंगळवारी याबद्दलची आकडेवारी जाहीर केली. यामुळे जवानांचे तणावपूर्ण जीवन आणि त्यांच्या जीवनातील समस्यांची चर्चा सुरु झाली आहे.

मागील तीन वर्षांमध्ये ९ अधिकारी आणि १९ ज्युनियर कमिशन अधिकाऱ्यांसह ३१० जवानांनी आत्महत्या केल्याची माहिती संरक्षण मंत्रालयाने मंगळवारी संसदेत दिली. याशिवाय या काळात ११ जवानांचा मृत्यू त्यांच्याच सहकाऱ्यांनी केलेल्या हल्ल्यांमध्ये झाला. ‘२०१४ मध्ये ८४ जवानांनी आत्महत्या केली. तर २०१५ आणि २०१६ मध्ये अनुक्रमे ७८ आणि १०४ जवानांनी आत्महत्या करुन जीवनयात्रा संपवली. तर स्वत:च्या सहकाऱ्यावर हल्ला करण्याचा प्रकार यंदाच्या वर्षात एकदाच घडला,’ अशी माहिती संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांनी दिली.

सशस्त्र दलांमधील जवानांच्या आत्महत्या रोखण्यासाठी आतापर्यंत अनेक उपाय करण्यात आले आहेत. लष्कर, नौदल आणि हवाई दलात काम करणाऱ्या जवानांना सहन करावा लागणारा कामाचा ताण कमी करण्यासाठी अनेक उपाययोजना करुनही त्यांचा उपयोग झालेला नाही. जवान कुटुंबापासून दूर तैनात असल्यामुळे अनेकदा त्यांना एकटेपणाचा सामना करावा लागतो. कुटुंबीयांपासून दूर राहून कुटुंबाला सहन कराव्या लागणाऱ्या समस्यांचा सामना जवानांना करावा लागतो. यामुळे अनेकदा जवान मानसिक तणावाखाली येतात. संपत्तीचे वाद, कौटुंबिक वाद, आर्थिक आणि वैवाहिक समस्या यांचा सामना करावा लागत असल्याने जवानांच्या मानसिक स्थितीवर परिणाम होतो.

जम्मू काश्मीर आणि ईशान्य भारतात दहशतवादविरोधी कारवायांमध्ये जवान अनेक दिवस गुंतून पडतात. याचा परिणाम जवानांच्या मनोधैर्य आणि शारीरिक क्षमतेवर होतो. याशिवाय अपुरे वेतन, मुलभूत सुविधांची कमतरता आणि काही वेळा वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून मिळणारी वर्तणूक याचे प्रतिकूल परिणाम जवानांवर होतात. यामुळे अनेक जवानांच्या मानसिक स्थितीवर परिणाम होतो. या सर्व परिस्थितीला कंटाळून अनेकदा जवान टोकाचे पाऊल उचलतात.