पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापले आहे. भाजपा व टीमसीमध्ये जोरदार संघर्ष पाहायला मिळत आहे. आज (गुरुवार) कुचबिहारमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी एका सभेत बोलताना टीएमसीवर जोरदार हल्ला चढवला. ”बंगालमध्ये ममता बॅनर्जी गुंडांच्या बळावर निवडणूक जिंकतात. आतापर्यंत १३० पेक्षा अधिक भाजपा कार्यकर्त्यांची टीएमसीच्या गुंडांनी हत्या केली. मात्र कोणतीही कारवाई झालेली नाही.” असा गंभीर आरोप त्यांनी टीएमसीवर यावेळी केला.

”जर बंगालमध्ये जय श्रीराम म्हणणार नाही, तर मग काय पाकिस्तानात म्हणणार का?” असा सवाल देखील अमित शाह यांनी टीएमसीला उद्देशून यावेळी केला. यावेळी अमित शाह म्हणाले निवडणूक संपेपर्यंत ममता बॅनर्जी देखील जय श्रीराम म्हणतील. केवळ एका विशिष्ट वर्गाची मतं मिळवण्यासाठी ममता बॅनर्जी असं करत आहेत.

तसेच, यावेळी अमित शाह यांनी घोषणा केली की, ”भाजपाच्या सरकार सत्तेवर येताच एका आठवड्यात बंगालमध्ये आयुष्मान योजना लागू केली जाईल. ममता बॅनर्जी मे महिन्यानंतर केंद्राच्या योजना लागू होण्यापासून रोखू शकणार नाहीत.”

आणखी वाचा- “मी रवींद्रनाथ टागोरांच्या जागेवर बसलो नव्हतो,” लोकसभेत अमित शाह यांचं स्पष्टीकरण

”मुख्यमंत्री ममता बॅनर्जी पंतप्रधान मोदींबरोबर कायम भांडत असतात, सुभाषचंद्र बोस यांच्या जयंती दिनी आयोजित कार्यक्रमात देखील त्यांनी वाद घातला. किमान सुभाषचंद्र बोस यांच्या कार्यक्रमात तरी त्यांनी राजकारण करायला नको होतं. मात्र त्या कायम भांडत असतात, यामुळे बंगालचं भलं होईल का?” असं देखील यावेळी अमित शाह म्हणाले.