आफ्रिकेतील युगांडा देशामध्ये तुरुंगातून कैदी पळून जाण्याची आगळीवेगळी घटना समोर आली आहे. येथील एका तुरुंगामधून २०० हून अधिक कैदी अर्धनग्नावस्थेत पसार झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार या कैद्यांनी आधी तुरुंगाच्या सुरक्षा रक्षकांवर ताबा मिळवला. त्यानंतर आपण तुरुंगातून पळून गेल्यानंतर कैद्यांच्या कपड्यांवरुन आपल्याला ओळखू नये म्हणून कैद्यांनी अंगावरील कपडे काढून तुरुंगातून पळ काढला. कैद्यांना दिले जाणारे कपडे अंगावर असते तर लष्कराकडून आपल्याला लगेच अटक होईल असा विचार करुनच कैद्यांनी अर्धनग्नावस्थेत पळण्याचा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येत आहे. सीएनएनने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे. या कैद्यांनी काही शस्त्र आणि स्फोटके पळवल्याचेही सांगण्यात येत आहे.

२१९ कैदी पळून जाण्याचा हा सर्व प्रकार ईशान्य युगांडातील तुरुंगामध्ये घडला आहे. पळू गेलेल्या कैद्याचा सध्या शोध घेतला जात आहे. हे तुरुंग अगदी दुर्गम भागात असून कैदी जंगलामध्ये पळून गेल्याचे सांगण्यात येत आहे. हे कैदी पळून जाताना सुरक्षा रक्षक आणि त्यांच्यामध्ये गोळीबारही झाला. यामध्ये एक सुरक्षारक्षक आणि दोन कैद्यांचा मृत्यू झाला. बुधावारी ही संपूर्ण घटना घडली. घटना मोरोटो जिल्ह्यातील लष्करी छावणीजवळ असणाऱ्या तुरुंगामध्ये घडली. सेनेच्या प्रवक्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार कैद्यांनी ऑन ड्युटी वॉर्डनला आधी ताब्यात घेतले. पळून गेलेले अनेक कैदी हे गंभीर अपराधांसाठी अटक करण्यात आलेले कैदी होते. ओळख लपवण्यासाठी हे कैदी कपडे काढून पळाल्याचेही अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं आहे. या कैद्यांनी शस्त्र भंडारामधील १५ एके ४७ बंदुकीही चोऱ्या असल्याचे प्रवक्त्यांनी स्पष्ट केलं आहे.

या कैद्यांना शोधण्यासाठी सध्या तपास सुरु आहे. संध्याकाळच्या वेळी हे कैदी अंधाराचा फायदा घेऊन पसार झाल्याने त्यांना शोधण्यास अडचणी निर्माण झाल्या. या कालावधीमध्ये हे कैदी वेगवेगळ्या ठिकाणी पसार झाल्याची शक्यता नाकारता येत नाही असंही अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं आहे. मात्र हे कैदी एखाद्या कापडाच्या दुकानावर डल्ला मारु शकतात असा अंदाजही व्यक्त केला जात आहे. मात्र या प्रकरणामुळे युगांडामधील कैद्यांची सुरक्षा हा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.