News Flash

‘एटीएम कोंडी’ फुटणार; देशभरातील ८० हजारांहून अधिक एटीएममध्ये बदल

तांत्रिक बदल करण्यात आलेल्या एटीएममधून चलनातील नवीन नोटा काढता येणार आहेत.

प्रातिनिधीक छायाचित्र

देशभरातील एटीएम चलनात आलेल्या नवीन नोटांचे व्यवहार करण्याच्या दृष्टीने सुसज्ज नसल्याचे लक्षात आल्यानंतर नवीन नोटांच्या आकारानुसार एटीएममध्ये बदल करण्यात आले आहेत. आतापर्यंत एकूण एटीएमपैकी ४० टक्के म्हणजेच ८२ हजार ५०० एटीएममध्ये आवश्यक बदल करण्यात आले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी सकाळपर्यंत एकूण २ लाख २० हजार एटीएमपैकी ८२ हजार ५०० एटीएममध्ये तांत्रिक बदल करण्यात आला आहे. केंद्र सरकारने नेमलेल्या कृती दलाच्या सूचनांनुसार एटीएममध्ये आवश्यक बदल करण्यात आल्याचे कॅश लॉजिस्टिक्स असोसिएशनचे अध्यक्ष रितूराज सिन्हा यांनी सांगितले. एटीएममध्ये तांत्रिक बदल करण्यात आल्याने एटीएमसमोरील रांगा कमी होण्यास मदत होऊन नागरिकांना दिलासा मिळणार आहे.

आरबीआयचे डेप्युटी गव्हर्नर एस. एस. मुंद्रा यांच्या नेतृत्वाखालील टास्क फोर्सचे सदस्य असलेल्या सिन्हा यांनी सांगितले की, एटीएममधील तांत्रिक बदल करताना ग्रामीण भागाला प्राधान्य देण्यात आले आहे. ग्रामीण भागात चलनी तुटवडा भासू नये, असा त्यामागीत हेतू आहे, असेही सिन्हा यांनी स्पष्ट केले. लोकांच्या वाढत्या मागणीनुसार आता प्रत्येक एटीएममध्ये ५० ते ६० लाख रुपयांची रोकड ठेवता येणे शक्य झाले आहे. एटीएममध्ये पुरेशा प्रमाणात रक्कम आहे आणि एटीएमसमोरील रांगा कमी होत चालल्या आहेत, असा दावाही सिन्हा यांनी यावेळी केला.

एटीएममध्ये तांत्रिक बदल करण्यापूर्वी प्रत्येक एटीएममध्ये साधारण १०० च्या नोटा असलेली ५ लाखांपर्यंतच रोकड ठेवता येत होती. एटीएमबाहेर लागणाऱ्या रांगांमुळे ती रक्कम अगदी तुटपुंजी ठरत होती. अवघ्या काही तासांतच ती संपत होती. लोकांना होणारा त्रास आणि गैरसोय दूर करण्यासाठी केंद्र सरकारने टास्क फोर्सची स्थापन केली. त्यानंतर टास्क फोर्स, आरबीआय, बँका आणि एटीएममध्ये रोकड वाहतूक करणारी संघटना अतिशय जलदगतीने आणि अखंडपणे काम करत आहे. एटीएममध्ये तांत्रिक बदल करण्याचे काम अतिशय वेगाने केले जात आहे. लोकांच्या मागणीनुसार या एटीएमच्या माध्यमातून पुरवठा केला जात आहे. देशभरातील काही ठिकाणी तांत्रिक बदल केलेले एटीएम २४ तास सुरू ठेवले जात आहेत, अशी माहितीही त्यांनी दिली. सध्याच्या घडीला दररोज साधारण १२ ते १४ हजार एटीएममध्ये तांत्रिक बदल करण्यात येत आहे. या महिन्याच्या अखेरीपर्यंत एटीएमसमोर लागणाऱ्या रांगा आणि तेथील परिस्थिती निवळण्याचा आमचा प्रयत्न आहे, असेही सिन्हा यांनी स्पष्ट केले. दरम्यान ८ नोव्हेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ५०० आणि १००० रुपयाच्या नोटा चलनातून बाद केल्या होत्या. त्यानंतर २००० रुपयाच्या नवीन नोटा चलनात आणल्या होत्या. या नोटांचा आकार आणि ठेवण यामुळे एटीएममधून त्या काढता येत नव्हत्या. आता या नवीन नोटांच्या आकारानुसार एटीएममध्ये बदल करण्यात आल्याने आता या नवीन नोटा एटीएममधून काढता येणार आहेत.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 22, 2016 7:10 pm

Web Title: more than 80 thousand atms recalibrated to dispense new notes
Next Stories
1 प्रख्यात गायक एम. बालमुरलीकृष्ण यांचे निधन
2 नोटाबंदी; हैदराबादमध्ये काँग्रेस नेत्याने बंद एटीएमची पूजा करून नोंदवला निषेध
3 प्रख्यात शास्त्रज्ञ एम. जी. के. मेनन कालवश
Just Now!
X