जगातील प्रत्येक तिसऱया महिलेवर शारीरिक आणि लैंगिक अत्याचार होत आहेत आणि संबंधित महिलेच्या जोडीदाराकडूनच हे कृत्य घडत असल्याचे संयुक्त राष्ट्रसंघाने केलेल्या एका पाहणीतून स्पष्ट झाले. जगातील वेगवेगळ्या देशांमध्ये महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण वाढत असल्याचेही या पाहणीत आढळले.
जागतिक आरोग्य संघटना, लंडन स्कूल ऑफ हायजिन ऍण्ड ट्रॉपिकल मेडिसिन आणि साऊथ आफ्रिकन मेडिकल रिसर्च कौन्सिल यांनी केलेल्या पाहणीतून ही धक्कादायक माहिती उजेडात आली. जगातील एक तृतीयांश महिला पुरुषांकडून होणाऱया छळवणुकीच्या आणि अत्याचाराच्या बळी ठरत असल्याचे पाहणीतून दिसून आले. पुरुष जोडीदाराकडून किंवा काही वेळ इतर पुरुषांकडून जगातील सुमारे ३५ टक्के महिलांवर अत्याचार होतात. जोडीदाराकडून होणाऱया छळवणुकीचे प्रमाण हे ३० टक्के आहे. जगातील वेगवेगळ्या देशांमध्ये हे प्रमाण सारखेच आहे. महिलांवरील अत्याचार हा काही देशांपुरता मर्यादित प्रश्न नसून, तो जागतिक आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाचा प्रश्न बनल्याचे जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक मार्गारेट चॅन यांनी सांगितले.
महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी जगातील आरोग्यविषयक व्यवस्थेने उपाय योजले पाहिजेत, अशीही अपेक्षा चॅन यांनी व्यक्त केली. महिला आणि मुलींवरील अत्याचारामुळे त्यांचे मानसिक आरोग्य बिघडते. त्यांच्यामध्ये हाडे तुटण्यापासून ते गर्भधारणेसंबंधीचे विविध प्रश्न निर्माण होतात, असेही या अहवालातून स्पष्ट झाले.