आयसिसचे दहशतवादी मोसुलमधील जुन्या शहरातील टायग्रिस नदीच्या पश्चिमेकडे एका छोटय़ा भागात अद्याप टिकून असून, हा भाग परत मिळवण्यासाठी इराकी फौजांनी सोमवारी धिम्या गतीने आगेकूच केली. आदल्याच दिवशी इराकी पंतप्रधानांनी येथील सैनिकांना भेटून, कष्टाने जिंकलेल्या या युद्धाबद्दल त्यांचे अभिनंदन केले होते.

अमेरिकेच्या नेतृत्वातील हवाई हल्ल्यांच्या मदतीने आयसिसच्या ताब्यात असलेला मोसुलचा अखेरचा भाग आपल्या सैनिकांनी परत मिळवल्यानंतरही, या शहराला स्लीपर सेल्स व दडवून ठेवलेल्या स्फोटकांपासून मुक्त करण्यासाठी मोसुलमध्ये ‘क्लिअरिंग ऑपरेशन्स’ सुरूच राहतील, असे इराकी विशेष फौजांचे ब्रिगेडियर जनरल हैदर फादिल यांनी सांगितले.

आयसिसचे शेकडो दहशतवादी अद्यापही या परिसरात असून ते महिला व मुलांसह त्यांच्या कुटुंबीयांचा मानवी ढाल म्हणून वापर करत असल्याचे इराकी सैन्याधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. आयसिसतर्फे सुरू असलेल्या या जीवन-मरणाच्या लढाईमुळे इराकी फौजांची वाटचाल मंदावली आहे.

मोसुलमध्ये लपून असलेले आयसिसचे दहशतवादी व त्यांचे कुटुंबीय यांची नेमकी संख्या अद्याप सांगता येत नाही, असे विशेष फौजांचे वरिष्ठ कमांडर लेफ्टनंट जनरल अब्दुल गनी अल-असादी म्हणाले. जुन्या शहरात उरलेल्यांपैकी बहुतांश आयसिस कुटुंबीय असले तरी त्यांच्याजवळ शस्त्रे नसल्यास आम्ही त्यांना नागरिक मानू असेही त्यांनी सांगितले.