देशभरात सायबर क्राईमच्या गुन्हेगारीमध्ये वाढ होत असून हॅकर्स नेहमी वेगवेगळ्या पद्धतींचा अवलंब करत आहेत. एकीकडे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत लोक स्मार्ट होण्याचा प्रयत्न करत असताना हेच तंत्रज्ञान खासगी आयुष्यातही घुसखोरी करत आहे. आतापर्यंत स्मार्टफोनच्या माध्यमातून लोकांची फसवणूक झाल्याचं आपण अनेकदा पाहिलं आहे. पण गुजरातमध्ये हॅकर्सनी स्मार्ट टीव्हीच हॅक केल्याचं समोर आलं आहे.

हॅकर्सनी स्मार्ट टीव्ही हॅक करत पती-पत्नीचा खासगी व्हिडीओ तयार करत तो इंटरनेटवर अपलोड केला होता. दांपत्याने तो व्हिडीओ पाहिल्यानंतर ही घटना उघडकीस आली. खासदार अमर साबळे यांनी राज्यसभेत हा मुद्दा उपस्थित केल्याने हे प्रकरण चर्चेत आलं आहे. याप्रकरणी हॅकर्सविरोधात कडक कारवाई केली जावी अशी मागणी त्यांनी केली आहे.


काय म्हणाले अमर साबळे ?
“देशातील सर्व दांपत्याच्या खासगी क्षणांच्या सुरक्षेकडे मी लक्ष वेधू इच्छितो. तंत्रज्ञानामुळे सुरक्षेला धोका असून सायबर सुरक्षेची गरज आहे. जागतिक स्तरावर तंत्रज्ञान आणि इंटरनेटमध्ये दिवसेंदिवस नवीन शोध लागत आहेत. नव्या तंत्रज्ञानाचा फायदा आहे तसा धोकाही आहे. बेडरुरममध्ये स्मार्ट टीव्ही असणं धोकादायक आहे. हॅकर्स आता आपल्या बेडरुममध्ये पोहोचले आहेत. सुरतमध्ये अशी दोन प्रकरणं समोर आली आहेत. त्यांनी स्मार्ट टीव्ही हॅक करुन पती-पत्नीचा व्हिडीओ बनवला. दांपत्याने व्हिडीओ पाहिल्यानंतर ही घटना उघडकीस आली. हॅकर्सनी कोणत्याही सिस्टमविना हे केलं आहे. ही अत्यंत गंभीर बाब असून कारवाई केली पाहिजे”.