मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांच्या उजव्या हातावरील बोटावर शनिवारी यशस्वीरित्या शस्त्रक्रिया करण्यात आली. भोपाळमधील हमिदिया या सरकारी रूग्णालयात त्यांच्यावर शस्त्रक्रिया पार पडली. त्यांच्या उजव्या हाताच्या बोटाला दुखापत झाल्याची त्यांची तक्रार होती. दरम्यान, या शस्त्रक्रियेसाठी दिल्लीहूनही डॉक्टरांना बोलावण्यात आले होते.

शस्त्रक्रियेपूर्वी कमलनाथ यांनी रूग्णालयातील अन्य रुग्णांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना येण्याजाण्यासाठी कोणत्याही प्रकारची समस्या उद्भवू नये, याची काळजी घेण्याचे निर्देश दिले होते. तसेच कोणालाही कोणती असुविधा होऊ नये, याचीही दक्षता घेण्यास सांगितले होते. दरम्यान, कमलनाथ यांनी रुग्णालयाची प्रशंसाही केली. तसेच आपण देशातील कोणत्याही रुग्णालयात जाऊ शकत होतो. परंतु हमिदिया या सरकारी रूग्णालायला प्राधान्य दिल्याचे त्यांनी सांगितले.

एकीकडे व्हिआयपी कल्चरच्या प्रभावाखाली अनेक नेतेमंडळी उपचारांसाठी परदेशात जात असताता. अशातच कमलनाथ यांनी सरकारी रुग्णालयात उपचार घेतल्याने त्यांच्या निर्णयाचे अनेकांकडून स्वागत होत आहे. मुख्यमंत्री कमलनाथ यांना हमिदिया रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्या उजव्या हाताच्या बोटामध्ये दुखापत झाली होती. त्यांच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली असून त्यांनी प्रकृती स्थिर आहे. शनिवारी सकाळी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्यांच्यावर शस्त्रक्रिया पार पडली. काही तासांसाठी त्यांना डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात येणार असून त्यानंतर त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात येणार असल्याची माहिती गांधी मेडिकल कॉलेजचे डीन अरूणा कुमार यांनी दिली.