महिला आणि मुलींविरोधात गुन्हे वाढत आहेत, नेमक्या याच मुद्द्यावर खासदार जया बच्चन यांनी राज्यसभेत तीव्र संताप व्यक्त केला. केंद्रीय महिला आणि बाल विकास राज्य मंत्री विरेंद्र कुमार यांनी मांडलेल्या मुद्द्याबाबत वाद सुरु होता. राज्यसभेत महिलांविरोधात वाढत्या अत्याचारांवर चर्चा सुरु होती. त्याचवेळी कुमार यांनी काही आकडेवारी समोर ठेवली. ज्यानंतर खासदार जया बच्चन चांगल्याच संतापल्या.

जया बच्चन यांनी थॉमसन रॉयटर्सचा अहवाल समोर ठेवत भारत जगात महिला अत्याचारांच्या बाबतीत जगात पहिल्या क्रमांकाचा देश ठरला आहे ही अत्यंत लाजीरवाणी बाब असल्याचे म्हटले. एवढेच नाही तर कुमार यांना त्या म्हटल्या की तुम्ही २०१५ पर्यंतची आकडेवारी सादर केली. मात्र २०१६, २०१७ आणि २०१८ या तीन वर्षात महिलांवर, मुलींवर जे अत्याचार झाले ते तुम्ही विसरलात का? मुलींच्या तस्करीची प्रकरणे वेगाने वाढली आहेत. यावेळी त्यांनी कठुआ प्रकरणाचा उल्लेखही केला. कठुआ सामूहिक बलात्कार प्रकरणी तुम्ही सविस्तर अहवाल देऊ शकता का? तसेच सरकार देशभरात महिलांवर होणाऱ्या वाढत्या अत्याचारांविरोधात श्वेतपत्रिका जारी करणार का? असे दोन प्रश्नही जया बच्चन यांनी कुमार यांना विचारले

थॉमसन रॉयटर्स या संस्थेने जो अहवाल सादर केला त्यातल्या आकडेवारी संदर्भात त्यांनी आमच्याशी काहीही संपर्क साधलेला नाही. या आकडेवारीचा नेमका आधार काय ते आम्हाला ठाऊक नाही असे कुमार यांनी सांगितले. ते बोलत असतानाच जया बच्चन यांनी त्यांना थांबवले आणि विचारले की रोज अशा घटना समोर येत आहेत, त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी तुम्ही काय केलेत? जे रोज घडते आहे त्याबद्दल तुमचे काय म्हणणे आहे? कठुआ बलात्कार प्रकरणाबाबत तुम्ही माहिती का देत नाही असे म्हणत जया बच्चन यांनी आपला संताप व्यक्त केला.