काँग्रेसचे खासदार अधीर रंजन चौधरी यांनी काल लोकसभेत अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याबद्दल केलेल्या टिप्पणीवरून आज पुन्हा एकदा गोंधळ झाला. भाजपाच्या खासदार पुनम महाजन यांनी अधीर रंजन चौधरी यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला. निर्बल तर तुम्ही आहात, कारण, केवळ एका परिवाराच्या महिलेसाठी तुम्ही उभे आहात व त्यांच्या सुरक्षेसाठी व सन्मानासाठी लढत आहात, मात्र देशातील महिलांच्या सुरक्षेसाठी तुम्ही काम करत नाहीत. अशा शब्दांत पुनम महाजन यांनी लोकसभेत टीका केली.

तेलंगणमधील डॉक्टर महिलेवर बलात्कार करून तिची हत्या केल्या गेल्याच्या, निषेधार्थ काल सर्व खासदार एकवटले होते. मात्र, थोड्यावेळानंतर ज्यांच्या नावात ‘धीर’ आहे, अशा अधीर रंजनजींच्या धीराचा बांध फुटला. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याबद्दल त्यांनी जी टिप्पणी केली आहे, ते सर्वात चुकीचे झाले, असल्याचे देखील खासदार पुनम महाजन यांनी लोकसभेत सांगितले.

लोकसभेमध्ये सोमवारी अनेक मुद्द्यांवरुन केंद्र सरकार आणि विरोधी पक्ष समोरासमोर आले होते. काँग्रेसचे खासदार अधीर रंजन चौधरी यांनी कॉर्पोरेट टॅक्सवर चर्चा करताना केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांना ‘निर्बला’ सितारामन असे संबोधले होते., ‘मी तुमचा नेहमीच सन्मान करतो. तुमच्याबद्दल मला आदरही आहे. पण कधी कधी विचार करतो की, तुम्हाला निर्मला सीतारामन ऐवजी निर्बला सीतारामन म्हणणं योग्य ठरेल का? कारण तुम्ही मंत्री पदावर आहात. मात्र तुम्हाला जे वाटते ते तुम्ही करता किंवा नाही हे मला माहित नाही.’ असे काँग्रेसचे नेते अधीर रंजन चौधरी यांनी म्हटले होते. यानंतर सत्ताधाऱ्यांनी जोरदार या वक्तव्यावर आक्षेप नोंदवत संसदेत काहीकाळ गोंधळ घातला होता.