उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत सर्व राजकीय पक्षांमध्ये कलगीतुरा चांगलाच रंगल्याचे दिसते. परंतु आता पक्षांतर्गतही बंडखोरीचे वारे वाहताना दिसत आहे. भाजपचे खासदार वरूण गांधी यांनी एका कार्यक्रमात केलेल्या भाषणात केंद्र सरकारलाच अडचणीत आणणारे मुद्दे उपस्थित करून पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांची नाराजी ओढावून घेतल्याचे समजते. मागील दोन वर्षांत देशात साडेसात हजार शेतकऱ्यांनी कर्जामुळे आत्महत्या केली. आणि दुसरीकडे मात्र विजय मल्ल्याने ९ हजार कोटी रूपये घेऊन देशातून पळ काढल्याचे त्यांनी एका शाळेत झालेल्या कार्यक्रमात म्हटले. तसेच रोहित वेमुलाची सुसाइड नोट वाचल्यानंतर आपल्यालाही रडू कोसळल्याचे त्यांनी म्हटले. याच मुद्द्यांवरून केंद्र सरकार अडचणीत आले होते. यापूर्वीही खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनीही अशाच प्रकारचे वक्तव्य करून खळबळ उडवून दिली होती.
Rohith Vemula ka suicide note padhke aankho mein aasu the.Usne likha tha main apni jaan le raha hu kyuki is roop mein paida hua-Varun Gandhi pic.twitter.com/NC0b1qWmCR
— ANI (@ANI) February 22, 2017
वरूण गांधी यांनी आपल्या भाषणात हे मुद्दे उपस्थित करून या प्रकरणाला पुन्हा एकदा चर्चेत आणले. भाजपला नको असलेले मुद्दे पुन्हा उपस्थित केल्याने पक्षातील इतर नेते नाराज असल्याचे सांगण्यात येते.
विजय मल्ल्या हे ९ हजार कोटींचे कर्ज बुडवून देशातून फरार असल्याचा आरोप आहे. त्यांच्यावर देशात अनेक खटले सुरू आहेत. याप्रकरणी मल्ल्यांची संपत्तीही जप्त करण्यात आली आहे. मल्ल्यांचे राज्यसभा सदस्यत्वही रद्द करण्यात आले आहे. पण आपल्या ट्विटच्या माध्यमातून ते सातत्याने आपण पळून गेले नसल्याचा दावा करतात.
हैदराबाद केंद्रीय विद्यापीठातील रोहित वेमुला संशोधन करत होता. त्याच्यावर विद्यापीठ प्रशासनाने अनेक निर्बंध लावले होते. त्यामुळे कंटाळून त्यांने आत्महत्या केल्याचा आरोप करण्यात येतो. त्याच्या आत्महत्येनंतर मोठा वाद झाला होता. यात केंद्र सरकारच्या भूमिकेवरही सवाल निर्माण करण्यात आला होता.
इंदूरमध्ये वरूण गांधींनी रोहित वेमुलाच्या आत्महत्येचाही मुद्दा उठवला होता. वेमुलाची सुसाइड नोट वाचल्यानंतर मला रडू आले होते, असे म्हटले. विरोधी पक्षांनी या मुद्द्यांवरून मोदी सरकारला घेरले होते. आता वरूण गांधी यांच्या या पावित्र्यावर पक्षातून काय प्रतिक्रिया येते हे पाहणे औत्सुक्याचे ठरले आहे.