रॉबिनहूड निर्देशांक अहवालाचा अंदाज

करांच्या पैशांवर सरकारचे कामकाज विनासायास सुरू असते, पण जगातील श्रीमंत व्यक्तींच्या संपत्तीच्या दानातून काही देशांची सरकारे तातडीची वेळ आल्यास चालवली जाऊ शकतात की नाही याचा जरा वेगळ्या अंगाने जाणारा आर्थिक अभ्यास २०१८ रॉबिनहूड निर्देशांक अहवालात करण्यात आला आहे. अर्थातच श्रीमंतांचे काढून गरिबांना  देण्याचा हा रॉबिनहूडपणा ही तूर्त तरी कल्पना आहे. एकूण ४९ देशांचा अभ्यास यात करण्यात आला असून त्यात तेथील सरकारांचा संचालन खर्च व श्रीमंत व्यक्तींची संपत्ती व त्यांनी दान दिल्यास काय होऊ शकते याचा विचार करण्यात आला.  डिसेंबर २०१७ अखेरच्या परिस्थितीचा विचार केला यात श्रीमंत महिलांची संख्या अगदी नगण्य म्हणजे चार असून त्यात अंगोला, ऑस्ट्रेलिया, चिली, नेदरलँड्स या देशातील महिला आहेत. या निर्देशांकात देशातील सर्वात श्रीमंत व्यक्तीचे उत्पन्न व देशाच्या सरकारचा खर्च यांची तुलना करण्यात आली. जर गृहितकानुसार सरकारकडील पैसाच काही कारणाने तात्पुरता संपला, तर श्रीमंत व्यक्तींची संपत्ती जर सरकारला दान केली गेली तर किती काळ सरकार चालू शकेल यावर आधारित असा ब्लूमबर्ग अब्जाधीश निर्देशांक अहवाल व नाणेनिधीचा सरकारी खर्चाचा अहवाल यांचा आधार घेऊन हा अंदाज घेण्यात आला. तुलनात्मक विचार करता सायप्रसचे सर्वात श्रीमंत व्यक्ती जॉन फेड्रिस्कन हे आहेत. त्यांच्या संपत्तीवर तेथील सरकारचा २०१८ मधील २३.६ दशलक्ष डॉलर्सचा खर्च ४४१ दिवस चालू शकतो. हा देश कमी लोकसंख्येचा असल्याने त्यांचा खर्च कमी आहे. यात फेड्रिस्कन यांची संपत्ती १० अब्ज डॉलर्स आहे.  जपान, पोलंड, अमेरिका व चीन या देशांचा खर्च जास्त आहे. चीनचे श्रीमंत व जगातील सोळाव्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती असलेले जॅक मा यांची संपत्ती ४७.८ अब्ज डॉलर्स आहे. ते चीनचे सरकार केवळ चार दिवस चालवू शकतात. अमेरिकेचे अब्जाधीश जेफ बेझोस हे तेथील  सरकारचा खर्च पाच दिवस चालवू शकतात.

४०.३ अब्ज डॉलर्सची संपत्ती

ब्रिटनचे ह्य़ूज ग्रॉसव्हेनॉर  व जर्मनीचे डाएटर श्वार्टझ हे साधारण तेवढाच काळ त्यांच्या संपत्तीवर सरकारचा खर्च  चालवू शकतात. भारताचे श्रीमंत व्यक्ती असलेले मुकेश अंबानी यांची संपत्ती ४०.३ अब्ज डॉलर्स असून ते वीस दिवस भारत सरकारचा खर्च चालवू शकतात. हाँगकाँगचे श्रीमंत व्यक्ती असलेले ली का शिंग यांची संपत्ती ३४.७ अब्ज डॉलर्स असून ते १९१ दिवस सरकारी खर्च चालवू शकतात. स्पेनचे अ‍ॅमनशियो ओर्टेगा यांची संपत्ती ७५.३ अब्ज डॉलर्स असून ते ४८ दिवस खर्च चालवू शकतील, तर सौदी अरेबियाचे अलवीद बिन तलाल यांची संपत्ती १७.८ अब्ज डॉलर्स असून ते २६ दिवस सरकारी खर्च  चालवू शकतात.