करोना महामारीने जगभरात थैमान घातलं आहे, त्यामुळे अनेक मोठमोठ्या उद्योगधंद्यांसह काही देशांच्या अर्थव्यवस्थेलाही झळ बसल्याचं समोर आलं. पण, दुसरीकडे उद्योजक मुकेश अंबानी यांच्यासाठी मात्र 2020 हे वर्ष खूपच चांगलं ठरताना दिसतंय. लॉकडाउनमध्ये मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रिजमध्ये अनेक बड्या कंपन्यांनी मोठी गुंतवणूक केली. त्यांच्या रिलायन्स जिओच्या व्यवसायातही वाढ झाली, आणि आता मुकेश अंबानी यांच्या संपत्तीतही वाढ झाली आहे. अब्जाधीश मुकेश अंबानी आता जगातील पाचवे सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत.
प्रसिद्ध बिजनेस मॅगझीन फोर्ब्सच्या अब्जाधीशांच्या यादीनुसार मुकेश अंबानी जगातील पाचवे सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत. रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन असलेल्या मुकेश अंबानी यांनी फोर्ब्सच्या अब्जाधीशांच्या यादीमध्ये अमेरिकी गुंतवणूकदार वॉरेन बफेट यांना मागे टाकत पाचव्या स्थानी झेप घेतली आहे. फोर्ब्सच्या यादीनुसार मुकेश अंबानी यांची संपत्ती 75 अब्ज डॉलर झाली आहे. यासोबतच त्यांनी वॉरेन बफेट यांना या यादीत मागे टाकलं. या यादीमध्ये बफेट यांची संपत्ती 72.7 अब्ज डॉलर असून ते सहाव्या क्रमांकावर आहेत.
आता मुकेश अंबानी यांच्यापेक्षा पुढे चौथ्या क्रमांकावर फेसबुकचे सीईओ मार्क झुकरबर्ग आहेत. त्यांची संपत्ती 89 अब्ज डॉलर आहे. तर पहिल्या क्रमांकावर 185.8 अब्ज डॉलरच्या संपत्तीसह अॅमेझॉनचे संस्थापक आणि सीईओ जेफ बेजोस आहेत. त्यांच्या नंतर माइक्रोसॉफ्टचे बिल गेट्स 113.1 अब्ज डॉलर संपत्तीसह दुसऱ्या स्थानी आणि एलव्हीएमएचचे बर्नार्ड अर्नोल्ट अँड फॅमिली 112.0 अब्ज डॉलरसह तिसऱ्या स्थानी आहे.
गेल्या महिन्यातच अंबानींच्या रिलायन्स इंडस्ट्रीजने आपली डिजिटल सेवा , Jio प्लॅटफॉर्म्समध्ये जवळपास 33 टक्के हिस्सेदारी फेसबुक आणि गुगलसह अन्य प्रमुख गुंतवणूकदारांना विकल्याने रिलायन्स इंडस्ट्रीज कर्जमुक्त झाली आहे. लॉकडाउनमध्ये रिलायन्सने एकूण 14 करारांची घोषणा केली आहे. अशात आता फोर्ब्सच्या यादीतही मुकेश अंबानी पाचव्या क्रमांकावर पोहोचले आहेत.