उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली गाडी सापडल्या प्रकरणी सुरु असलेला तपास तिहार जेलपर्यंत पोहोचला आहे. टेलिग्राम अॅपच्या माध्यमातून या स्फोटकांची जबाबदारी घेणारा एक मेसेज पाठवण्यात आला होता. हा मेसेज दिल्लीच्या तिहार जेलमधील कारागृहातून पाठवण्यात आला होता. या कारागृहात इंडियन मुजाहिद्दीनच्या दहशतवाद्याला ठेवण्यात आलं असल्याचं पोलिसांनी सुत्रांच्या हवाल्याने सांगितलं असल्याचं वृत्त एनडीटीव्हीने दिलं आहे.

दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने तहसीन अख्तरला ठेवण्यात आलेल्या कारागृहात धाड टाकल्यानंतर टेलिग्राम ग्रुप तयार करण्यात मोबाइल हाती लागला. २०१४ मध्ये पाटणामध्ये नरेंद्र मोदींच्या रॅलीला टार्गेट करत करण्यात आलेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी तहसीन अख्तरला अटक करण्यात आली आहे. हैदराबाद आणि बोधगया येथील साखळी स्फोटांमध्येही त्याचं नाव आहे.

टेलिग्रामवर अकाऊंट तयार करण्यासाठी Tor ब्राऊझरचा वापर करत व्हच्यूअल नंबरची मदत घेण्यात आली होती. यानंतर या अकाऊंटचा वापर करत अंबानींच्या घराबाहेर ठेवण्यात आलेल्या स्फोटकांची जबाबदारी घेण्यात आली होती. पोलीस तहसीन अख्तरची चौकशी करण्यासाठी त्याला ताब्यात घेण्याचा विचार करत आहेत. दरम्यान सप्टेंबरमध्ये अॅक्टिव्ह असणारा आणखी एक नंबर विशेष पथकाच्या रडारवर आहे. सध्या हा नंबर बंद आहे. दोन्ही नंबर बनावट ओळखपत्राच्या सहाय्याने खरेदी करण्यात आले होते.

दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, “तिहार कारागृह प्रशासनाने दहशतवादी असणाऱ्या बराकमधून मोबाइल जप्त केले आहेत. यांच्या माध्यमातून टेलिग्राम अकाऊंट हाताळत दहशतवादी हल्ले तसंच धमक्यांची जबाबदारी घेतली जात असावी असा संशय आहे”.