गेल्याच आठवड्यात नजरकैदेतून सुटलेला दहशतवादी हाफिज सईद स्वत:ची प्रतिमा सुधारण्याचा प्रयत्न करताना दिसतोय. त्यासाठी त्याने संयुक्त राष्ट्रात याचिका दाखल केली आहे. दहशतवाद्यांच्या यादीतून आपले नाव हटवण्यात यावे, अशी मागणी त्याने या याचिकेतून केली आहे. जमात-उद-दावाचा म्होरक्या असलेल्या हाफिज सईदला मुंबईवरील २६/११ हल्ल्यानंतर संयुक्त राष्ट्राकडून दहशतवादी घोषित करण्यात आले होते.

अमेरिकेने २६/११ हल्ल्याआधीच हाफिज सईदचा समावेश दहशतवाद्यांच्या यादीत केला होता. मे २००८ मध्ये अमेरिकेने हाफिजला दहशतवादी म्हणून घोषित करण्याचा निर्णय घेतला. मुंबईवरील २६/११ हल्ल्यानंतर अमेरिकेने हाफिजवर १ कोटी डॉलरचे बक्षीस ठेवले आहे. या हल्ल्यात १६४ लोकांचा मृत्यू झाला होता. यामध्ये ६ अमेरिकन नागरिकांचा समावेश होता. हाफिज सईदची गेल्याच आठवड्यात पाकिस्तानी न्यायालयाने नजरकैदेतून सुटका केली आहे. हाफिज २९७ दिवस नजरकैदेत होता.

हाफिज सईदच्या सुटकेवर जगभरातून टीका झाली आहे. त्याच्या नजरकैदेत वाढ करण्याची मागणी पाकिस्तान सरकारने न्यायालयाकडे केली होती. मात्र न्यायालयाने पुराव्यांअभावी त्याची सुटका केली. यानंतर काश्मीरच्या स्वातंत्र्यासाठी लढा कायम सुरु ठेवणार असल्याची गरळ हाफिजने ओकली होती. हाफिजच्या सुटकेचा अमेरिकेने तीव्र शब्दांमध्ये निषेध केला होता. हाफिज सईदला अटक करण्याची मागणी अमेरिकेच्या सरकारने पाकिस्तानकडे केली होती. ३१ जानेवारीला हाफिज सईद आणि त्याचे ४ साथीदार (अब्दुल्ला उबैद, मलिक जफर इक्बाल, अब्दुल रहमान आबिद और काजी काशीफ हुसेन) यांना पंजाब प्रांताच्या सरकारने दहशतवादविरोधी कायदा १९९७ च्या अंतर्गत नदरकैदेत ठेवले होते.