चीनमधल्या लिनझिया या पश्चिमेकडील प्रांतामध्ये मुस्लीमांची लोकसंख्या दाट असून या भागाला लिटल मक्का असंही म्हणतात. एएफपी या वृत्तसंस्थेनं दिलेल्या वृत्तानुसार इथल्या मुस्लीमांवर चीनच्या निधर्मी कम्युनिस्ट राजवटीनं प्रचंड बंधनं आणली आहेत. तसंच इस्लामचं नामोनिशाण मिटवण्याचा प्रयत्न होत असल्याचं स्थानिकांचं म्हणणं आहे.

पश्चिम चीनमधल्या लिनझिया हा प्रांत मुस्लीमबहुल असून इथल्या हुई मुस्लीमांना आत्तापर्यंत बऱ्यापैकी धार्मिक स्वातंत्र्य होतं. आता मात्र वयाच्या 16 वर्षांखालील मुलांना धार्मिक शिक्षण घेण्यास बंदी घालण्यात आल्याचं स्थानिकांनी एएफपी वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले. झिंजिंयाग या भागातही मुस्लीम मोठ्या संख्येने राहतात. या प्रांतातला कट्टरपंथी इस्लाम व फुटीरतावादी चळवळ चीन अत्यंत निर्दयपणे मोडून काढत आहे. कुराण बाळगण्यास अथवा दाढी वाढवण्यास उघूर मुस्लीमांना पूर्ण बंदी आहे. हाच प्रकार हुई मुस्लीमांच्या बाबतीतही आता करण्यात येत असल्याचे सांगण्यात येत आहे.

झिंजिंयागमधलं मॉडेल इथंही राबवण्यात येत असल्याची भीती वाटत असल्याचे एका इमामानं नाव न सांगण्याच्या अटीवर कबूल केले. प्रत्येक मशिदीत किती मुलांनी शिक्षण घ्यायचं, किती इमाम असावेत या सगळ्यावर चिनी राजवटीनं कठोर निर्बंध घालण्यास सुरूवात केली आहे. चीनमध्ये 355 मशिदी असून ध्वनीप्रदूषण होते असं सांगत सगळ्या मशिंदींवरील भोंगे काढून टाकण्यात आले आहेत. तसेच प्रत्येक मशिदीवर चीनचा राष्ट्रध्वज फडकावण्याची सक्ती करण्यात आली आहे. चीनच्या सरकारला मुस्लीमांना सेक्युलर करायचे असून इस्लामला मूळापासून उखडायचे आहे असे मत एका इमामानं व्यक्त केलं आहे. उन्हाळी व हिवाळी सुट्ट्यांमध्ये कुराणाचे धडे गिरवण्यासाठी दर वर्षी एक हजारच्या आसपास मुलं यायची. मात्र आता त्यांना प्रवेशही दिला जात नाही. सौदी अरेबियातून मागवलेली असंख्य धार्मिक पुस्तकं इथं आहेत, परंतु 16 वर्षांवरील अवघ्या 20 मुलांना त्यांचं अध्ययन करण्याची परवानगी दिली जात आहे.

कुराणचा अभ्यास सोडून सेक्युलर अभ्यास केला तर त्यातच मुलांचं भलं आहे असं पालकांना सांगण्यात येत आहे. हुई प्रांतात मुस्लीमांच्या लोकसंख्येच्या 50 टक्के म्हणजे सुमारे दोन कोटी मुस्लीम राहतात. आत्तापर्यंत ते चीनमध्ये बहुसंख्य असलेल्या हानवंशीयांशी मिळून मिसळून राहत होते व त्यांना त्यांच्या प्रथा परंपरांचं पालन करण्याची व धार्मिक स्वातंत्र्याची हमी होती. परंतु आता कुठल्याही अल्पवयीन मुलाला कुराणचा अभ्यास करण्यासाठी मशिदीत पाठवता येणार नाही असा फतवा स्थानिक प्रशासनानं काढला आहे. लहान मुलांना धार्मिक शिक्षण देताच येणार नाही अशी परिस्थिती चिनी राजवट तयार करत असून अशाच दोन पिढ्या गेल्या तर आमच्या सगळ्या धार्मिक प्रथा परंपरा नष्ट होतील अशी भीती एका महिलेनं व्यक्त केली आहे.

झिंजिंयांगच्या अनुभवातून धार्मिक शिक्षणामुळे कट्टरतेकडे व दहशतवादाकडे तरूण वळतात असा चिनी राज्यकर्त्यांचा समज झाल्याचे मत एका इमामानं व्यक्त केलं आहे. मात्र हुई मुस्लीम स्वत:ला उघूर मुस्लीमांपेक्षा वेगळे समजतात. मा जियानकाई या हुई मुस्लीमानं सांगितले की उघूर मुस्लीम हे हिंसक व रक्तपातावर विश्वास ठेवणारे आहेत, आम्ही मात्र तसे नाहीयोत. लहानपणी लिनझियामध्ये कुराणाच्या अभ्यासासाठी या भागात चीनमधल्या अन्य प्रांतातून आलेल्या एका तरूणानं सांगितलं की परिस्थिती बदलली असून यापुढे मला इथं राहता येईल अशी केवळ आशा बाळगणं माझ्या हातात आहे.