देशातील मुस्लिम समाजाच्या एकूण लोकसंख्येचा विचार करता या समाजाला अल्पसंख्यांक म्हणणे तितकेसे योग्य ठरणार नाही. त्याऐवजी संख्येने कमी असणाऱ्या पारशी समाजाकडे अल्पसंख्यांक म्हणून अधिक लक्ष पुरविण्याची गरज असल्याचे नवनिर्वाचित केंद्रीय अल्पसंख्यांक मंत्री नजमा हेप्तुल्ला यांनी सांगितले. अल्पसंख्यांक समाजासाठी पंतप्रधानांनी आखलेल्या १५ कलमी कार्यक्रमात पारशी समाजाकडे विशेष लक्ष पुरविण्याचा मुद्दा समाविष्ट करण्यासाठी पंतप्रधानांशी चर्चा करणार असल्याची माहिती नजमा हेप्तुल्ला यांनी अल्पसंख्यांक खात्याचा पदभार स्विकारल्यानंतर दिली. यावेळी नोकऱ्यांमध्ये मुस्लिम समाजाला आरक्षण देण्याबाबत विचारण्यात आले असता, धर्माच्या आधारे आरक्षण देण्याबाबतचा प्रस्ताव सध्या सर्वोच्च न्यायालयाच्या अधीन असल्याचे त्यांनी सांगितले. देशातील अल्पसंख्यांक समुहांचा विचार करता त्यामध्ये पारशी समाज हा संख्येने लहान आणि कमकुवत आहे. ज्याप्रमाणे एखाद्या आईला सहा मुले असतील, तर सर्वात लहान असणाऱ्या मुलाकडे आई अधिक लक्ष पुरविते. त्याचप्रमाणे देशातील अल्पसंख्यांक समुहांचा विचार करता पारशी समाज हा अल्पसंख्यांक मंत्रालयाचे सहावे अपत्य असून, या समाजाकडे अधिक लक्ष देण्याची गरज नजमा हेप्तुल्ला यांनी व्यक्त केली. मात्र, त्याचवेळी लोकसंख्येचा विचार करता मुस्लिम समाजाला अल्पसंख्यांक म्हणणे कितपत योग्य ठरेल असे बोलून नजमा हेप्तुल्ला यांनी नवे प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे.