रविवारी उत्तर प्रदेशच्या मुझफ्फरनगरमध्ये किसान महापंचायत झाली. या महापंचायतीला राजकीय मेळावा असल्याचं म्हणत केंद्रीय मंत्री आणि मुझफ्फरनगरचे खासदार संजीव बाल्यान यांनी टीका केली आहे. तसेच भारतीय किसान युनियनचे राकेश टिकैत हे देशाच्या शत्रुंच्या हातातील शस्त्र बनले आहेत, अशा शब्दांत त्यांनी हल्ला चढवला. शेतकरी नेत्यांना केंद्र सरकारच्या विरोधात केलेल्या आंदोलनाबद्दल पाकिस्तान सरकारकडून त्यांचे कौतुक करायचे आहे का, याबद्दल विचार करावा, असंही बाल्यान म्हणाले.

मुझफ्फरनगरमधील किसान महापंचायतीबद्दल रेडिओ पाकिस्तानने ट्विट केले होते. या ट्विटला उत्तर देताना बाल्यान म्हणाले, “जेव्हा निवडणुका येतात तेव्हा उत्तर प्रदेशमध्ये खूप जास्त रॅली होतात आणि प्रत्येकजण रॅलीमध्ये भाग घेतो. जे भारताचे शत्रू आहेत किंवा आमचा विरोध करतात, या नेत्यांना पाकिस्तानसारख्या शत्रु राष्ट्रांनी पसंत करावं, अशी त्यांची इच्छा आहे का, हे स्वतःच ठरवण्याची गरज आहे,” असेही बाल्यान म्हणाले.

“कालची महापंचायत ही किसान महापंचायतीऐवजी रजनीतिक महापंचायत आणि एक राजकीय मेळावा आहे, असे वाटले. त्या मेळाव्यात शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर क्वचितच चर्चा झाली. शेतकऱ्यांचा अजेंडा पुढे नेण्यासाठी विविध राजकीय पक्षांकडून त्यांचा गैरवापर केला जात आहे. आम्ही त्या महापंचायतीमध्ये विविध राजकीय पक्षांचे बॅनर आणि झेंडे पाहिले. शेतकऱ्यांना लाल किल्ल्यावर कोण नेले हे सर्वांना माहीत आहे,” असेही बाल्यान म्हणाले.

केंद्राने पारीत केलेल्या तीन कृषी कायद्यांच्या विरोधात रविवारी मुझफ्फरनगरमध्ये किसान महापंचायत आयोजित केली गेली. आगामी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत शेतकरी भाजपच्या विरोधात प्रचार करणार असल्याचे या महापंचायतीत जाहीर केले गेले. या महापंचायतीमध्ये विविध राजकीय पक्षांचा सहभाग होता.

दरम्यान, उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुका भाजप पुन्हा जिंकेल असा विश्वास खासदार बाल्यान यांनी व्यक्त केला. “उत्तर प्रदेशात पुन्हा एकदा भाजप सरकार स्थापन करेल. राज्यात फेब्रुवारीमध्ये निवडणुका आहेत आणि मार्चमध्ये आम्ही सरकार स्थापन करू. जे आमचा विरोध करताहेत त्यांनाही आम्ही मतं मागू, अगदी ज्यांनी महापंचायत केली त्यांच्याजवळही मत मागण्यासाठी आम्ही जाऊ. २०१२ ते २०१७ या दरम्यानचा काळ हे राज्य अजूनही विसरलं नाही,” असंही ते म्हणाले.