नागरिकत्व सुधारणा विधेयकाच्या निषेधार्थ बंद

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आसाम दौऱ्यावेळी दोन ठिकाणी लागोपाठ दुसऱ्या दिवशी काळे झेंडे दाखवण्यात आले. वादग्रस्त नागरिकत्व सुधारणा विधेयकाच्या निषेधार्थ लोकांनी हे कृत्य केले आहे. सचिवालयाजवळ जनता भवन येथे नग्न आंदोलन करणाऱ्या कृषक मुक्ती संग्राम समितीच्या सहा जणांना पोलिसांनी अटक केली असून ताय अहोम युवा परिषदेने मोदींच्या आसाम भेटीविरोधात बारा तासांच्या बंदचे आवाहन केले होते त्यामुळे काही भागात जनजीवन विस्कळित झाले.

मोदी हे येथील  राजभवनावरून विमानतळाकडे जात असताना आसाम जातीयतावादी युवा छात्र परिषदेच्या कार्यकर्त्यांनी मछकोवा चौकात त्यांना काळे झेंडे दाखवले.  त्यानंतर त्यांच्या वाहनांचा काफिला गौहाटी विद्यापीठावरून जात असताना जालुकबारी येथेही त्यांना काळे झेंडे दाखवण्यात आले असून दोन्ही गटांच्या सदस्यांना स्थानबद्ध करण्यात आले आहे. शुक्रवारी मोदी यांचे गुवाहाटी येथे आगमन झाल्यानंतर त्यांना विमानतळावरून राजभवनावर येत असताना चार ठिकाणी काळे झेंडे दाखवण्यात आले. गुवाहाटी विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी जलुकबारी भागात त्यांना काळे झेंडे दाखवले, तर अदाबरी व फॅन्सी बझार भागात कृषक मुक्ती संग्राम समिती व एजेवायसीपी या संघटनांच्या सदस्यांनी त्यांना काळे झेंडे दाखवले.  अखिल आसाम विद्यार्थी संघटना म्हणजे आसूच्या सदस्यांनीही काळे झेंडे दाखवून  उझान बझार येथे काळे झेंडे दाखवून घोषणाबाजी केली. नागरिकत्व (सुधारणा) विधेयक हे हिंदू,जैन, ख्रिश्चन, शीख,  बौद्ध, अफगाणी यांना त्यांच्याजवळ कागदपत्रे नसतानाही केवळ सहा वर्षे वास्तव्य असेल तरी त्यांना नागरिकत्व देणार आहे. हे विधेयक लोकसभेत संमत झाले असून राज्यसभेत त्याला मंजुरी मिळालेली नाही.