पंतप्रधानांचा आरोप; राज्यातील सत्ताधाऱ्यांवर खंडणीखोरीचा आरोप

पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेसच्या सरकारने मध्यमवर्गीयांच्या स्वप्नांचा चुराडा केल्याचा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथील सभेत केला. राज्य सरकारवर त्यांनी खंडणीखोरीचा आरोप केला.

औद्योगिक शहर अशी ओळख असलेल्या दुर्गपूरमधील सभेत पंतप्रधानांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना लक्ष्य केले. ज्याप्रमाणे यापूर्वी साम्यवादी सरकारांनी लोकशाही कमकुवत करण्याचा प्रयत्न करण्याचा प्रयत्न केला, तोच कित्ता ममता गिरवत आहेत, असा आरोप पंतप्रधानांनी केला. जनतेची स्वप्ने केंद्र सरकार पूर्ण करील असे आश्वासन पंतप्रधानांनी दिले आहे. सबका साथ सबका विकास या धोरणानुसारच केंद्रीय अर्थसंकल्पात जनआकांक्षेचे प्रतिबिंब उमटल्याचे मोदींनी सांगितले. केंद्र सरकारने गेल्या साडेचार वर्षांत पश्चिम बंगालसाठी ९० हजार कोटींचे पायाभूत प्रकल्प मंजूर केले, मात्र राज्य सरकारने त्याबाबत फारसा रस दाखविला नाही, असा दावा पंतप्रधानांनी केला. शाळा, महाविद्यालयात प्रवेश असो किंवा नोकऱ्या, जनतेला खंडणी द्यावी लागते, असा आरोप पंतप्रधानांनी राज्य सरकारवर केला. आम्ही जनतेबरोबर असून, हे फार काळ चालणार नाही असे स्पष्ट केले. पश्चिम बंगाल सरकार भाजप कार्यकर्त्यांविरोधात दडपशाही करत आहेत. मात्र हिंसाचाराला न घाबरता आमचे कार्यकर्ते तोंड देत आहेत हे कौतुकास्पद असल्याचे मोदींनी सांगितले.

उत्तर परगणा जिल्ह्य़ात सभेत चेंगराचेंगरी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ठाकूरनगर, पश्चिम बंगाल : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा उत्तर २४ परगणा जिल्ह्य़ातील ठिकाणी सुरू असताना शनिवारी चेंगराचेंगरीसदृश परिस्थिती निर्माण झाली. त्यात अनेक जण जखमी झाले, त्यामुळे मोदी यांना भाषण आवरते घ्यावे लागले. मातुआ समाजाचे लोक या सभेस मोठय़ा प्रमाणात उपस्थित होते.  मोदी यांच्या सभेच्या वेळी त्यांचे शेकडो समर्थक बाजूला उभे होते. त्यांनी अचानक  सभेच्या मैदानातील आतल्या भागात घुसण्याचा प्रयत्न केला, त्या वेळी चेंगराचेंगरी झाली. मोदी यांनी जमावाला समजावण्याचा प्रयत्न केला.