पंतप्रधानांची टीका; पश्चिम बंगालमध्ये पहिली प्रचारसभा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पश्चिम बंगालमध्ये प्रचारात सत्ताधारी तृणमूल काँग्रेसवर टीकास्त्र सोडले. तसेच केरळमध्ये एकमेकांच्या विरोधात लढणारे डावे-काँग्रेस येथे एकत्र कसे येतात, असा सवाल पंतप्रधानांनी केला. गेल्या पाच वर्षांत बंगालमध्ये एकही मोठा उद्योगधंदा आला नसल्याचा आरोप मोदींनी केला. केवळ मुख्यमंत्री बदलले मात्र परिस्थिती तशीच असल्याचा आरोप पंतप्रधानांनी केला.
ममतांचे वर्तन राजेशाही थाटाचे असल्याचा आरोप पंतप्रधानांनी केला. राज्यातील जनतेचे जीवनमान उंचावण्यात तृणमुल काँग्रेसला अपयश आले. शारदा घोटाळा तसेच नारद स्टिंग ऑपरेशनचा पंतप्रधानांनी उल्लेख केला. भ्रष्टाचाऱ्यांना मतदान करणार काय, असा सवाल त्यांनी जनतेला केला. दिल्लीत आमचे सरकार आहे मात्र तुम्ही घोटाळ्यांच्या बातम्या ऐकल्या आहेत काय, असा सवाल केला. ३४ वर्षांच्या डाव्या पक्षांच्या राजवटीने बंगाल उद्ध्वस्त केला. तृणमूलच्या सरकारने स्थिती आणखी खराब केली. राज्यात बॉम्ब तयार करण्याचा उद्योग केवळ जोरात सुरू असल्याचा टोला मोदींनी लगावला.
अजानसाठी भाषण थांबवले
प्रचारसभा सुरू असतानाच मैदानाशेजारच्या मशिदीतून अजान ऐकू येताच मोदींनी भाषण थांबवले. सर्व धर्माचा आदर करणे ही आमची परंपरा असा उल्लेख या वेळी मोदींनी केला. काही मिनिटे मोदींनी भाषण थांबवले. सुमारे २० मिनिटे त्यांनी भाषण केले. सभेला मोठा प्रतिसाद मिळाला. मोदींच्या या कृतीचे खरगपूर येथील अफताब व मिदनापूर येथील अमिर खान यांनी कौतुक केले.