माकपचे सरचिटणीस सीताराम येचुरी यांनी केंद्रातील भाजप सरकारच्या पहिल्या वर्षाचे वर्णन ‘आपत्तीजनक’ असे करत नरेंद्र मोदींच्या कार्यपद्धतीवर जोरदार टीका केली.
संसदीय कामांचा बगल देणारे सरकार अशी ओळख केंद्रातील एनडीए सरकारची झाली असल्याचे येचुरी यावेळी म्हणाले. भाजप सत्तेत आल्यापासून गेल्या वर्षभरात देशात अतिशय घातक आणि संकटमय ट्रेंड निर्माण झाला आहे. नव-उदारमतवादी आर्थिक धोरणे, संसदीय प्रक्रियेला बगल आणि जातीयवादी शक्तींची वाढ या तीन मोठ्या समस्या गेल्या एका वर्षात आपण ओढावून घेतल्या असल्याची टीका येचुरी यांनी केली. वर्षभरात विविध क्षेत्रांत प्रगती करत असल्याचा दावा करणाऱया भाजपने महागाई कमी झाली का? याचे उत्तर जनतेला द्यावे असाही घणाघात यावेळी येचुरी यांनी केला. मोदींच्या परदेश दौऱयांवर देखील येचुरी यांनी निशाणा साधला. गेल्या वर्षभरात तब्बल १८ देशांचे परदेश दौरे करणाऱया मोदींना परदेशात देखील आपल्या विरोधकांची निंदानालस्ती करण्यात जास्त रस होता, असे येचुरी म्हणाले.