देशातील सर्व भाजपशासित राज्यांनी नेहमीच गरीबांच्या कल्याणासाठी काम केले आहे. काँग्रेसने नेहमीच फक्त गरीबांचा मतांसाठी वापर करून घेतला. मात्र, काँग्रेसच्या तुलनेत भाजपशासित राज्यांनी नेहमीच सर्वांगिण विकासावर भर दिला आहे, असं भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी म्हणाले.
गेल्या दहा वर्षांमध्ये मध्य प्रदेश शिवराज सिंह चौहान यांच्या नेतृत्वाखाली विकासाच्या दिशेने वाटचाल करत आहे. काँग्रेसची मध्य प्रदेश कार्यकारीणी गेल्या दहा वर्षांपासून उपाशी आहे. जर या उपाशी लोकांच्या हातामध्ये राज्याची धुरा दिली तर ते मध्य प्रदेशचे वाटोळे करतील, असेही ते म्हणाले. भोपाळ येथे आयोजित ‘कार्यकर्ता महाकुंभ’मध्ये भाषण करताना त्यांनी शिवराज सिंह चौहान यांचे गोडवे गात पुन्हा एकदा काँग्रेसवर जोरदार टीका केली.
भाजपच्या पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून निवड झाल्या नंतर नरेंद्र मोदी आज(बुधवार) प्रथमच लालकृष्ण अडवाणी यांच्या सोबत भोपाळ येथील  सभेमध्ये एका व्यासपीठावर आले. आडवाणी व्यासपीठावर येताच मोदी यांनी आडवाणी यांच्या पाया पडत नमस्कार केला.
सभेच्या सुरूवातीलाच लालकृष्ण आडवाणी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. भाजप भाषणे करून वाढला नाही त्यासाठी प्रचंड परिश्रम घ्यावे लागले असल्याचे आडवाणी म्हणाले.  
शिवराज सिंह चौहान यांनी काँग्रेसच्या भ्रष्टाचारावर टीका करत काँग्रेसच्या सुरूवातीपासूनच्या भ्रष्टाचारांची ‘एबीसीडी’ वाचून दाखवली. “भाजप येत्याकाळामध्ये भारताच्या भविष्याचे वाटोळे होऊ देणार नाही,” असे चौहान म्हणाले.
भाजप नेते व्यंकय्या नायडू यांनी मोदींचे कौतूक करत नरेंद्र मोदींच्या तोडीचा नेता संपूर्ण काँग्रेसमध्ये नसल्याचे म्हणाले.
मध्य प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री व भाजपच्या नेत्या उमा भारती यांनी काँग्रेस उपाध्यक्ष राहूल गांधी यांच्यावर टीका केली. “राहूल गांधी गरीबांच्या घरी जातात. त्यांच्या सोबत चहा घेतात, जेवण करतात. मात्र, ‘रामराज्य’ तेव्हाच येईल जेव्हा हे गरीब लोक राहूल गांधींच्या घरी जावून चहा घेतील,” असे भारती म्हणाल्या. आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये शिवराज सिंह चौहाना यांना मोठा विजय मिळवून देण्याचे आवाहण उमा भारती यांनी उपस्थितांना केले.
मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या या सभेसाठी भाजपचे नेते नरेंद्र मोदी आणि अडवाणी हे दोन दिग्गज एकत्र  आले.  त्या आधी भाजपच्या पंतप्रधान पदाच्या उमेदवारीची माळ नरेंद्र मोदींच्या गळ्यात पडल्यावर अडवानी नाराज झाले होते. भाजपच्या १३ सप्टेंबरच्या पक्ष संसदीय मंडळाच्या बैठकीला अडवाणी गैरहजर होते. अडवानी यांनी त्यांची नाराजी पक्षाध्यक्ष राजनाथ सिंह यांना पत्रा द्वारे कळवली देखील होती. त्या नंतर त्यांचे मन परिवर्तन करण्यामध्ये भाजपच्या नेत्यांना यश आले असून, आज पुन्हा ते एका व्यासपीठावर येत आहेत. भोपाळमधील भाजपच्या या सभेसाठी साडे सात लाख लोक उपस्थित राहणार असल्याचे भाजपकडून सांगण्यात आले आहे.
काँग्रेसने भाजपच्या या सभेसाठी करण्यात येणाऱ्या अवाढव्य खर्चावर टीका केली आहे. भाजप या एका सभेसाठी १५० कोटी रूपये खर्च करत असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. भाजप राज्यामध्ये सर्वच आघाड्यांवर कमी पडल्यामुळे असे कार्यक्रम आयोजित करून भाजप नेते त्यांच्या नाकर्तेपणावर पडदा टाकत असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे.
या वर्षाच्या शेवटी मध्य प्रदेश विधान सभेची निवडणूक असून, भोपाळमधील या सभेने भाजपने प्रचाराला सुरूवात केली आहे.