काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी बुधवारी काळ्या पैशाच्या प्रश्नावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्ला चढविला. मोदी केवळ बोलतात, मात्र आश्वासनांची पूर्तता करण्याचे धैर्य त्यांच्यात नाही, असे स्पष्ट करून राहुल गांधी यांनी, ‘ना कुछ मिला है, ना कुछ मिलेगा’ अशी नवी घोषणा दिली.
लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या वेळी मोदी यांनी, परदेशातील काळा पैसा परत आणून प्रत्येक नागरिकाच्या बँक खात्यात १५ लाख रुपये जमा करण्याची घोषणा केली होती. हे पैसे तुमच्यापर्यंत पोहोचले का, असा सवाल राहुल गांधी यांनी केला.
राहुल सध्या आपल्या अमेठी लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर असून बुधवारी त्यांनी ताहियावान गावात घेतलेल्या बैठकीत, ‘ना कुछ मिला है, ना कुछ मिलेगा’ अशी घोषणा दिली. आयपीएलचे माजी आयुक्त ललित मोदी यांच्याबद्दल आपण बोलतो तेव्हा मोदी मौन पाळतात, असेही राहुल म्हणाले.
पराभूतांना संधी नाही!
गेल्या निवडणुकीत जे उमेदवार पराभूत झाले त्याच उमेदवारांना या वेळी संधी देण्यात येऊ नये, अशी मागणी या वेळी कार्यकर्त्यांनी केली, ती राहुल गांधी यांनी मान्य केली.