नरेंद्र मोदी विरोधात असताना पंतप्रधानांचा अपमान करायचे. मात्र आम्ही पंतप्रधानपदाचा अनादर करत नाही, अशा शब्दांमध्ये काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी मोदींवर निशाणा साधला. ‘आम्ही भाजप आणि मोदींच्या चुकांकडे बोट दाखवतो. मात्र आम्ही पंतप्रधानपदाचा अपमान करत नाही,’ असे राहुल गांधी यांनी म्हटले. गुजरात दौऱ्यावर असलेल्या राहुल गांधी यांनी सोशल मीडिया हाताळणाऱ्या स्वयंसेवकांशी संवाद साधला.

‘आम्ही केवळ पंतप्रधान मोदी आणि भाजपच्या चुकांवर बोट ठेवतो. त्यांच्या धोरणांमधील उणिवा दाखवून देतो. मोदी जेव्हा विरोधात होते, त्यावेळी ते पंतप्रधानांचा (मनमोहन सिंग) अपमान करायचे. मात्र आम्ही पंतप्रधानपदाचा अपमान करत नाही. हाच मोदी आणि आमच्यामधील फरक आहे. मोदी आमच्याबद्दल काहीही बोलले तरी आम्ही एका ठराविक मर्यादेबाहेर जाऊ शकत नाही,’ असे राहुल गांधी यांनी म्हटले. ‘आम्ही जे सत्य आहे, तेच बोलतो आणि गुजरातमध्ये विकास वेडा झाला आहे, हेच सत्य आहे,’ असेही ते म्हणाले.

यावेळी राहुल गांधींनी सोशल मीडिया हाताळणाऱ्या त्यांच्या टीमचीही माहिती दिली. ‘आमच्याकडे ३-४ जणांची टीम आहे. मी त्यांना काही सूचना देतो. मात्र मी वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देत बसत नाही,’ अशा शब्दांमध्ये राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींना टोला लगावला. ‘मी माझ्या सोशल मीडिया टीमला माहिती देतो. त्यानंतर आमच्याकडून राजकीय विषयांवर ट्विट केले जातात,’ असे राहुल गांधी यांनी उपस्थितांना सांगितले.

याआधी शनिवारी राहुल गांधी यांनी जीएसटीवरुन मोदी सरकारवर निशाणा साधला होता. ‘भारताला गब्बर सिंग टॅक्स नको, तर साधा आणि सरळ जीएसटी हवा आहे. काँग्रेस आणि देशातील जनतेने लढून अनेक वस्तूंवरील २८ टक्के जीएसटी संपवला आहे. जीएसटी १८ टक्केच असायला हवा, यासाठी आमचा संघर्ष सुरुच असेल. जर भाजपला हे जमले नाही, तर आम्ही ते करुन दाखवू,’ असे ट्विट राहुल गांधी यांनी केले होते.