भूतानमधील विद्यार्थ्यांना पंतप्रधान मोदी यांची ग्वाही

भूतानच्या विद्यार्थ्यांमध्ये असामान्य कर्तृत्वाची ताकद आहे, त्यातून ते भावी पिढय़ांवर ठसा उमटवू शकतात, असा प्रेरक संदेश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी भूतान येथे रॉयल युनिव्हर्सिटीतील विद्यार्थ्यांसमोर बोलताना दिला. भूतानचे भवितव्य घडविण्याच्या या प्रयत्नात त्यांना १.३ अब्ज  भारतीय मित्रांची साथ आहे, अशी ग्वाही त्यांनी दिली. भूतानचा दौरा आटोपून ते मायदेशी रवाना झाले आहेत.

भूतानच्या रॉयल युनिव्हर्सिटीत मोदी यांनी सांगितली की, भूतानच्या युवकांनी कठोर परिश्रम करून देशाला उंचीवर घेऊन जावे. आगामी काळात अनेक आव्हाने असली तरी ती पेलण्यास युवकांनी अभिनव मार्ग काढून सज्ज असले पाहिजे. कुठल्याही मर्यादा तुमच्या कर्तृत्वाच्या आड येता कामा नये. आजच्या जगात अनेक संधी आहेत. असामान्य गोष्टी करण्याचे सामथ्र्य व क्षमता भूतानच्या युवकांमध्ये आहे.

यावेळी भूतानचे पंतप्रधान लोटे शेरिंग उपस्थित होते. मोदी यांनी सांगितले की, भूतानी युवकांच्या या प्रयत्नात त्यांना १.३ अब्ज  भारतीय मित्रांची साथ आहे. ते तुमच्या समवेत भागीदारीने काम करतील. भारताचे नॅशनल नॉलेज नेटवर्क व भूतान यांच्यात सहकार्य सुरू आहे. त्याचा लाभ भूतानच्या तरुणांना मिळेल. भारतातील विद्यापीठे, वाचनालये, आरोग्य व कृषी संस्था जोडल्या गेल्या आहेत, त्यातूनही मोठे सहकार्य साधले जाणार आहे.

‘एक्झाम वॉरियर्स’चा उल्लेख: फेसबुक पोस्टमध्ये भूतानचे पंतप्रधान शेिरग यांनी मोदी यांच्या एक्झाम वॉरियर्स पुस्तकाचा उल्लेख केला होता त्यावर मोदी यांनी सांगितले की, हे पुस्तक तरुणांना उपयोगी आहे. ताण न घेता परीक्षांना सामोरे कसे जायचे हे त्यात दिले आहे. या पुस्तकात गौतम बुद्धांच्या तत्त्वांचाच आधार घेतला आहे. सकारात्मकता, भीतीवर मात ही मूल्ये यात महत्त्वाची आहे.