‘नॅशनल हेराल्ड’ प्रकरणावरून काँग्रेस नेते आक्रमक झाले असतानाच त्याचा परिणाम संसदेच्या संपूर्ण हिवाळी अधिवेशनावर होऊ नये, यासाठी सत्ताधारी भाजपकडूनही प्रयत्न करण्यात येत आहेत. सोनिया गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी ट्विटरच्या माध्यमातून त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. सोनिया गांधी यांना दीर्घ आणि आरोग्यदायी आयुष्य लाभावे, अशी भावना नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली आहे. दुसरीकडे संसदीय कामकाज मंत्री व्यंकय्या नायडू यांनी दूरध्वनीवरून सोनिया गांधी यांना शुभेच्छा दिल्या.
‘नॅशनल हेराल्ड’ या बंद पडलेल्या दैनिकाची ५००० कोटी रुपयांची मालमत्ता बेकायदा बळकावल्याप्रकरणी सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना दिलासा देण्यास दिल्ली उच्च न्यायालयाने सोमवारी नकार दिला होता. या दोघांनी दिल्लीतील न्यायालयात उपस्थित राहावे, असे आदेश दिल्लीतील स्थानिक न्यायालयाने दिले होते. त्याला स्थगिती देण्यास दिल्ली उच्च न्यायालयाने नकार दिला. सोनिया गांधी आणि राहुल गांधी येत्या १९ डिसेंबर रोजी या प्रकरणी स्वतः दिल्लीतील न्यायालयात उपस्थित राहणार आहेत. त्यांचे वकील अभिषेक मनू सिंघवी यांनी स्वतः याबद्दल मंगळवारी पत्रकारांना माहिती दिली.
या प्रकरणाचे पडसाद मंगळवारी लोकसभा आणि राज्यसभेमध्ये उमटले. दोन्ही ठिकाणी काँग्रेसच्या सदस्यांनी घोषणाबाजी केल्यामुळे दिवसभर काहीही कामकाज होऊ शकले नाही. या अधिवेशनात वस्तू व सेवा कर विधेयक मंजूर करून घेण्याला सरकारचे प्राधान्य असेल, आता नॅशनल हेराल्ड प्रकरणावरून काँग्रेसचे सदस्य अधिवेशनाच्या पूर्ण काळात घोषणाबाजी करून कामकाजात व्यत्यय आणू नये, यासाठी सरकारला यातून तोडगा काढावा लागणार आहे. हे प्रकरण न्यायालयात असल्यामुळे सरकार काहीही करू शकत नाही, असे केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी मंगळवारी स्पष्ट केले होते. भाजपचे नेते सुब्रमण्यम स्वामी यांनीच याप्रकरणी न्यायालयात याचिका दाखल केलेली असल्यामुळे काँग्रेसचे नेते भाजपवर रोष व्यक्त करत आहेत.