स्वातंत्र्य चळवळीनंतर जन्माला आलेल्या पिढीने यंदाच्या लोकसभा निवडणुकीत नेतृत्त्व केले आहे. आमच्या पिढीने स्वातंत्र्यसंग्राम बघितलेला नसून, सुराज्य हाच आमचा संकल्प असल्याचे भारतीय जनता पक्षाच्या घवघवीत यशाचे शिल्पकार नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी संध्याकाळी वडोदरामध्ये सांगितले.
वडोदरामधील जनतेने मोदींना विक्रमी मताधिक्याने विजयी केले. त्यानंतर वडोदरावासियांचे आभार मानण्यासाठी मोदींनी तिथे जाहीर सभा घेतली. या सभेत मोदी संपूर्ण देशवासियांचे आभार मानले. आपल्या विजयावर पहिला हक्क वडोदरावासियांचा असल्याचे सांगून मोदी म्हणाले, भारतीय जनता पक्ष स्वबळावर सत्ता स्थापन करण्याची ही पहिलीच वेळ आहे. याआधी पक्षाची सर्व सरकारे इतर पक्षांच्या साथीने किंवा पाठिंब्याने सत्तेवर आली होती. मात्र, यावेळी पहिल्यांदाच भाजपचे सरकार स्वबळावर सत्तेत आले आहे. सत्तेत आल्यानंतर सरकार कोणत्या एका पक्षाचे नसते. ते काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत राहणाऱया सर्व देशवासियांचे असते, असे स्पष्ट करून त्यांनी आपण आता केवळ गुजरातचे राहिले नसून, देशाचे झालेलो असल्याचेही मोदी म्हणाले.
वाराणसीमध्ये निवडणूक लढवताना मला जे काही सांगायचे होते, ते सांगण्याची संधी मला दिली नाही. तरीही तेथील लोकांनी मोदींवर मोहोर लगावली. ही घटना भारतीय राजकारणातील अत्यंत महत्त्वाची असल्याकडेही मोदींनी लक्ष वेधले. त्याचबरोबर सर्वसाधारण निवडणुकांमध्ये पहिल्यांदाच पाच लाख ७० हजार इतक्या विक्रमी मताधिक्याने कोणी निवडून आले असेल, असेही मोदी म्हणाले. वडोदरावासियांनी आपल्यावर जे प्रेम केले आणि निवडणुकीचे नामांकन भरल्यानंतर अवघी ५० मिनिटे दिल्यावरही त्यांनी मला इतक्या मतांनी निवडून दिले, याबद्दलही त्यांनी आभार मानले.
मराठीतून आभार
आपले औपचारिक भाषण संपल्यानंतर मोदींनी मराठीतूनही उपस्थितांशी संवाद झाले. कसे काय झाले, चांगले झाले ना, असे प्रश्न त्यांनी उपस्थितांना विचारल्यावर सर्वांनी मोठा जल्लोष केला.