प्लुटो हा ग्रह आहे की नाही? असा प्रश्न तुम्हाला विचारल्यास तुम्ही नक्कीच थोडे गोंधळात पडाल. खरं तर २००६ साली नासाच्या शास्त्रज्ञांनी प्लुटो ग्रह नसल्याचे जाहीर करत त्याला सुर्यमालेतून हद्दपार केले होते. मात्र आता नासाचे प्रमुख जीम ब्रिडेन्स्टाइन यांनी प्लुटो हा ग्रहच असल्याचे म्हटले आहे. नासाच्या प्रमुख्यांच्या या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा प्लुटो ग्रह आहे की नाही यावर चर्चा सुरु झाली आहे.

ओक्लाहोमा येथे झालेल्या ‘फर्स्ट’ या रोबोंच्या प्रदर्शनामध्ये जीम बोलताना जीम यांनी प्लुटो ग्रहच असल्याचे म्हटले आहे. हवामानशास्त्रज्ञ कोरी रेपेनहेगन यांनी जीम यांच्या भाषणातील त्यांच्या वक्तव्याचा व्हिडिओ ट्विट केला आहे. ‘माझ्या दृष्टीने प्लुटो हा ग्रहच आहे असे मी तुम्हाला सांगू इच्छितो,’ असं वक्तव्य जीम यांनी या व्हिडिओत केले आहे. ‘हवं तर तुम्ही लिहून घेऊ शकता की नासाने प्लुटोला पुन्हा ग्रह असल्याचे जाहीर केले. आम्हाला याच पद्धतीने शाळेत शिकवण्यात आले होते आणि माझा त्याच्यावर विश्वास आहे,’ असंही जीम पुढे म्हणाले.

नासाच्या प्रमुखांनी व्यक्त केलेले हे मत इंटरनॅशनल अॅस्ट्रोनॉमिकल युनियनने (आयएयू) घेतलेल्या निर्णयाचा विरोध करणारे आहे. आयएयूने २००६ साली प्लुटो ग्रह नसून एक बटू ग्रह असल्याचे जाहीर केले होते. २००५ साली प्लुटोपासून काही अंतरावर एरिस या बटू ग्रहाचा शोध लागल्यानंतर प्लुटोला प्रदान करण्यात आलेला ग्रहाचा दर्जा काढून त्याला बटू ग्रह घोषित करण्यात आले होते. यावेळी आयएयूने एखाद्या गोष्टीला ग्रह जाहीर करण्याचे तीन नियम निश्चित करुन या नियमांमध्ये बसणाऱ्या अंतराळातील वस्तूला ग्रह घोषित करण्यात येईल असं ठरवण्यात आलं. या नियमांनुसार प्लुटो हा सुर्यमालेच्या सर्वात बाहेरील बाजूला फिरणाऱ्या कुपीयर बेल्टमधील खगोलीय वस्तू असल्याचे सांगत त्याला आणि नव्याने शोध लागलेल्या एरिसला बटू ग्रहाचा दर्जा देण्यात आला. १९३० साली अमेरिकन संशोधक क्लाइड टॉम्बॉग यांनी प्लुटोचा शोध लावला होता. तेव्हापासून त्याला सूर्यमालेतील नवव्या ग्रहाचे स्थान देण्यात आले होते. मात्र ७६ वर्षांनंतर त्याला बटू ग्रह घोषित करण्यात आले.