नसीरुद्दीन शाह हे या देशाबाबत जे बोलले त्या त्यांच्या भावना आहेत. त्यांना जे वाटले ते त्यांनी बोलून दाखवले. मात्र म्हणून ते सत्य आहे असे आपण मानणार का? असा प्रश्न ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांनी विचारला आहे. या देशात एवढं स्वातंत्र्य आहे की तुम्ही लष्कराला शिव्या देऊ शकता. लष्करप्रमुखांबद्दल वाट्टेल ते बरळू शकता. जवानांवर दगड फेकू शकता आता आणखी किती स्वातंत्र्य या देशाला हवं आहे? असेही प्रश्न अनुपम खेर यांनी विचारले आहेत. तसेच नसीरुद्दीन शाह जे म्हटले आहेत ते त्यांचे मत आहे ते वास्तव आहे आपण का समजतो आहोत? असाही प्रश्न अनुपम खेर यांनी उपस्थित केला आहे.

काय म्हटले होते नसीर?

‘देशातील हे वातावरण पाहता मला माझ्या मुलाची चिंता वाटते. कारण त्यांचा कोणता धर्म नाहीये. आम्ही आमच्या मुलांना धर्माची शिकवण दिली नाही. कारण चांगलं किंवा वाईट याचं धर्माशी काही देणंघेणं नाही असं मला वाटतं. काय योग्य, काय अयोग्य हे माझ्या मुलांना मी शिकवलं आहे. उद्या माझ्या मुलांना एखाद्या जमावाने घेरलं आणि तुमचा धर्म कोणता असं विचारलं तर ते काय उत्तर देणार याची मला चिंता वाटते. कारण त्यांच्याकडे कोणतंच उत्तर नसेल.’

नसीरुद्दीन शाह हे म्हटल्यानंतर वाद निर्माण झाला होता. ज्यानंतर मी जे बोललो त्या माझ्या भावना आहेत त्या व्यक्त केल्या तर माझे कुठे चुकले? मनातल्या भावना व्यक्त केल्याने मी गद्दार ठरतो का? असेही प्रश्न नसीरुद्दीन शाह यांनी उपस्थित केले होते. तर भाजपा आणि संघाकडून नसीरुद्दीन शाह यांच्या वक्तव्याचा ज्या प्रकारे निषेध केला जातो आहे तो पाहता नसीर यांचे वक्तव्य योग्यच असल्याची टीका काँग्रेसने केली आहे. अशात आता अनुपम खेर यांनी नसीरुद्दीन मनातले बोलले ते खरे आहे असे आपण का मानतो आहोत असा प्रतिप्रश्न केला आहे.