नवजोत सिंग सिद्धू हे पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करण्याची संधी सोडत नाहीत, त्यांच्या देहबोलीवरून आणि ट्विटवरून हेच दिसते आहे. पुलवामा येथे झालेल्या हल्ल्यात देशाचे चाळीस जवान शहीद झाले. सगळा देश हळहळला असतानाही सिद्धू यांनी पाकिस्तानशी चर्चा करूनच काश्मीर प्रश्न सुटू शकतो असं वक्तव्य केलं होतं. ज्यानंतर सिद्धूंवर अनेक नेटकऱ्यांनी निशाणा साधला होता आणि त्यांना पाकिस्तानात जा असंही सुनावलं होतं. तसंच कपिल शर्मा शोमधून त्यांची हकालपट्टी करा अशीही मागणी केली होती. ज्यानंतर कपिल शर्मा शोमधून सिद्धू यांची हकालपट्टीही करण्यात आली.

आता या सगळ्या टीकेनंतर गप्प बसतील ते सिद्धू कसले? त्यांनी आज या सगळ्या टीकेला उत्तर देत पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष्य केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे इम्रान खान, नवाज शरीफ यांच्यासोबतचे फोटो ट्विट करत आप करे तो खुद्दारी कोई और करे तो गद्दारी असं ट्विट सिद्धू यांनी केलं आहे. तुम्ही करता ती चर्चा इतरांनी केली तर ती गद्दारी ठरते का? असा प्रश्न विचारत तुम्हाला सत्याचा सामना करावा लागेल आणि त्यापुढे तुमची हार होईल असाही संदेश लिहिला आहे. सिद्धू यांनी केलेल्या या टीकेमुळे ते पुन्हा एकदा ट्रोल होण्याची शक्यता आहे. ही शक्यता सिद्धू यांनीही लक्षात घेतली असून नहीं डरता तुम्हारे भाडे के टोलसे असंही ट्विटच्या शेवटी सिद्धू यांनी लिहिलं आहे.

आता सिद्धू यांच्या खोचक ट्विटनंतर भाजपा नेते त्यांना काय आणि कसं उत्तर देणार हे पहाणे महत्त्वाचे ठरणार आहे. सोशल मीडियावर सिद्धू ट्रोल झाल्यानंतर त्यांना कपिल शर्मा शोमधूनही हाकलण्यात आले. त्यानंतरही त्यांनी प्रसारमाध्यमांसमोर येत चर्चेने प्रश्न सुटू शकतो या माझ्या वक्तव्यावर मी ठाम असल्याचे सांगितले. तसेच आज ट्विट करत पंतप्रधान नरेंद्र मोदी कसे चर्चा करत होते ते फोटोंद्वारे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. आता त्यांच्या टीकेला भाजपा नेत्यांकडून तशाच आशयाचं उत्तर आलं तर आश्चर्य वाटायला नको.