संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार आणि काँग्रेसचे नेते ए. के. अ‍ॅण्टनी यांची भेट घेऊन त्यांना पूर्व लडाखमधील स्थितीबाबत अवगत केले, असे या घडामोडींशी संबंधित सूत्रांनी सांगितले.

पूर्व लडाखमधील भारताच्या लष्करी सज्जतेबाबत राजनाथसिंह यांनी दोघा माजी संरक्षणमंत्र्यांना सविस्तर माहिती दिली. या वेळी संरक्षण दलांचे प्रमुख जन. बिपिन रावत आणि लष्करप्रमुख जन. मनोज नरवणे हेही उपस्थित होते. संसदेचे पावसाळी अधिवेशन १९ जुलैपासून सुरू होत असून त्यापूर्वी विरोधी पक्षांशी संपर्क साधण्याचा संरक्षणमंत्र्यांचा हा प्रयत्न आहे, अशी चर्चा आहे. तथापि, या बैठकीबाबत कोणतेही अधिकृत भाष्य करण्यात आलेले नाही.

त्यापूर्वी राज्यसभेतील सभागृह नेते पीयूष गोयल यांनी माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग आणि पवार यांची भेट घेतली. चीनसमवेत सीमेवरील तणावाचा मुद्दा संसदेत उपस्थित करण्यात येणार असल्याचे काँग्रेसने यापूर्वीच सूचित केले आहे.