बिहार विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला केवळ तीन जागा देणे हा आघाडीतील घटक पक्षांकडून करण्यात आलेला अपमान आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेसने म्हटल्याने बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या नेतृत्वाखालील धर्मनिरपेक्ष पक्षांच्या महाआघाडीला तडे जाण्याचे संकेत मिळत आहेत.
बिहार विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला महाआघाडीत १२ जागा द्याव्यात, अशी मागणी पक्षाच्या वतीने करण्यात आली होती. आमच्या या मागणीकडे दुर्लक्ष करण्यात आले, जागावाटपाला अंतिम स्वरूप देण्यापूर्वी आमच्याशी सल्लामसलतही केली नाही, हा आमचा अपमान असून तो सहन केला जाणार नाही, असे राष्ट्रवादीचे सरचिटणीस तारिक अन्वर यांनी स्पष्ट  केले.
बिहार निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाली आघाडीला रोखण्यासाठी सत्तारूढ जद(यू), राजद, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने महाआघाडी केली आहे. नितीशकुमार, लालूप्रसाद यादव, सी. पी. जोशी यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत जागावाटप जाहीर केले. जद(यू) आणि राजदला प्रत्येकी १००, काँग्रेसला ४० तर राष्ट्रवादीसाठी केवळ तीन जागा देण्यात आल्या. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना आपण याबाबत कल्पना दिली आहे. आम्ही १२ जागांची मागणी केलेली असताना केवळ तीन जागा देण्यात आल्याचे पवार यांना सांगितले, असे अन्वर म्हणाले. आम्हाला १२ पेक्षा कमी जागा मिळाल्यास तडजोड केली जाणार नाही, जागावाटप सन्मानाने झाले पाहिजे, असेही अन्वर यांनी स्पष्ट केले.