आगामी लोकसभेची निवडणूक स्वबळावर लढण्याची घोषणा शिवसेनेने नुकतीच ‘एनडीए’पासून फारकत घेतली होती. त्यानंतर आता ‘आंध्र प्रदेशच्या तेलगू देसम पार्टीकडूनही (टीडीपी) ‘एनडीए’ला रामराम केला जाण्याची शक्यता आहे. चंद्राबाबू नायडू यांचा टीडीपी पक्ष ‘एनडीए’ आघाडीतील प्रमुख घटकपक्षांपैकी एक आहे. मात्र, केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांच्याकडून गुरुवारी सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पानंतर चंद्राबाबू प्रचंड नाराज झाल्याचे समजते.

या पार्श्वभूमीवर चंद्राबाबू नायडू यांनी शुक्रवारी सकाळी राज्य मंत्रिमंडळाची बैठकही बोलावली होती. या बैठकीत अर्थसंकल्पात आंध्र प्रदेशला अपेक्षित वाटा न मिळाल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. यावरून आता टीडीपी भाजपसोबत असलेली युती तोडायचा विचार गांभीर्याने करत आहे. आम्ही आता युद्ध छेडायच्या तयारीत आहोत. आता आमच्यासमोर केवळ तीन पर्याय आहेत. एक म्हणजे प्रयत्नपूर्वक युती कायम ठेवणे, दुसरे म्हणजे आमच्या खासदारांनी राजीनामा देणे किंवा तिसऱ्या पर्यायाचा अवलंब करायचा झाल्यास आम्हाला भाजपासोबतची युती तोडावी लागू शकते, अशी प्रतिक्रिया टीडीपी खासदार टीजी व्यंकटेश यांनी व्यक्त केली.

भाजपा आणि टीडीपी यांनी २०१४ साली एकत्रितपणे लोकसभेची निवडणूक लढवली होती. मात्र, आंध्र प्रदेशाच्या विभाजनानंतर केंद्राकडून दुर्लक्ष झाल्यामुळे राज्य महसूली तुटीच्या ओझ्याखाली दबले. तसेच आंध्र प्रदेशची नवी राजधानी अमरावतीमध्ये विकासकामांसाठी पुरेसा निधी दिला जात नसल्याचे टीडीपीला वाटते. त्यामुळे गेल्या काही काळात या दोन्ही पक्षांतील दरी सातत्याने वाढत आहे.

काही दिवसांपूर्वीच चंद्राबाबू नायडू यांनी आपल्या पक्षातील नेत्यांना भाजपा किंवा स्वपक्षाच्या धोरणांविरोधात टीका न करण्याविषयी बजावले होते. युतीचा धर्म पाळत असल्यामुळे आम्ही शांत आहोत. माझ्या सहकाऱ्यांनाही मी भाजपाविरोधात बोलू नका, असे सांगितले आहे. मात्र, भाजपाला आमची साथ नकोशी झाली असेल तर मी त्यांना ‘नमस्ते’ करून माझ्या वाटेने चालायला मोकळा आहे, असा इशारा चंद्राबाबू नायडू यांनी दिला होता.