बिहारच्या आनंदकुमार यांच्या प्रेरणेतून उपक्रम

वृत्तसंस्था, भुवनेश्वर

जेईई प्रवेशासाठीच्या परीक्षेत वंचित मुलांना यश मिळण्यासाठी ज्याप्रमाणे बिहारमध्ये आनंदकुमार यांनी सुपर ३० उपक्रम राबवला त्याप्रमाणे आता ओडिशात नीट परीक्षेत वंचित मुलांना चांगले यश मिळावे यासाठी जिंदगी फाउंडेशनची स्थापना करण्यात आली, त्यांचे १९ गरीब विद्यार्थी यंदाच्या नीट या वैद्यकीय अभ्यासक्रम प्रवेश परीक्षेत चमकले आहेत.

नीट परीक्षेचा निकाल शुक्र वारी जाहीर झाला होता त्यात मजूर, भाजी विक्रेते, ट्रक चालक, मच्छिमार, इडली वडा विक्रेते यांची मुले यशस्वी झाली आहेत. त्याचे श्रेय जिंदगी विश्वस्त गटाला आहे. हा गट शिक्षणतज्ज्ञ अजय बहादूर सिंह यांनी स्थापन केला असून त्यांनी गरिबीत दिवस काढले आहेत. बालपणी त्यांना उपासमारीला तोंड द्यावे लागले. त्यांच्याजवळ पैसेही नसायचे. जिंदगी उपक्रमात ओडिशातील गरीब मुलांना ते नीट परीक्षेचे प्रशिक्षण देत आहेत. बिहारमध्ये गणितज्ज्ञ आनंदकुमार यांनी जेईई परीक्षेत गरीब मुलांना यश मिळावे यासाठी असाच सुपर ३० उपक्रम राबवला होता त्यात वंचित गटातील ३० विद्यार्थ्यांना ते जेईईचे प्रशिक्षण देत असत. यंदाच्या नीट २०२० परीक्षेत जिंदगी उपक्रमातील १९ पैकी १९ विद्यार्थी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाले असून त्यांनी इतिहास घडवला आहे असे सिंह यांनी सांगितले. या यशस्वी विद्यार्थ्यांत अंगुल जिल्ह्य़ातील खिरोदिनी साहू हिचा समावेश आहे. तिचे वडील शेतमजूर आहेत. त्यांची नोकरी करोना काळात गेली होती.

२०१८ मध्येही यश

२०१८ मध्ये या संस्थेचे १४ पैकी १२ विद्यार्थी नीट परीक्षेत पात्र ठरले होते. सुपर ३०चे प्रमुख गणितज्ञ आनंदकुमार यांनी जिंदगी फाउंडेशनला भेट दिली आहे. चित्रपट अभिनेता हृतिक रोशन याने सुपर ३० चित्रपटात आनंदकुमार यांची भूमिका केली होती. त्यांनीही ओडिशातील जिंदगी फाउंडेशनच्या कामाचे कौतुक केले आहे.