देशभरात करोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत आहे. या पार्श्वभूमीवर नियोजित परीक्षा  पुढे ढकलण्यात येत आहे. नुकतंच केंद्र सरकारने सीबीएसईच्या (CBSE) दहावी बोर्डाच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय जाहीर केलेला असताना, आता NEETPG – 2021 परीक्षा देखील पुढे ढकलण्यात आली आहे.

‘सीबीएसई’ दहावीची परीक्षा रद्द

केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी ट्विटद्वारे याबाबत माहिती दिली आहे. करोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने NEETPG – 2021 परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय़ घेतला आहे. ही परीक्षा १८ एप्रिल रोजी होणार होती. परीक्षेची नवीन तारीख नंतर ठरवली जाणार आहे. मेडिकल विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या हिताच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला आहे. असं ट्विट केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी केलं आहे.

मोठी बातमी! मेडिकलच्या परीक्षाही पुढे ढकलण्याचा निर्णय

करोनाच्या पार्श्वभूमीवर ठाकरे सरकारने वैद्यकीय शिक्षण विभागाच्या परीक्षाही पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केल्यानंतर वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी हा निर्णय घेतला आहे. १९ एप्रिलपासून सुरू होणाऱ्या वैद्यकीय परीक्षा जूनपर्यंत पुढे ढकलण्यात आल्या आहेत. परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी होत असताना अमित देशमुख यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करुन पुढील ७२ तासांत निर्णय घेऊ अशी ग्वाही दिली होती. त्यानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे. परीक्षेचे सविस्तर वेळापत्रक महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठामार्फत जाहीर करण्यात येणार आहे.