मलेशियाच्या एमएच ३७० या बेपत्ता विमानाचा शोध घेण्याच्या संदर्भात ऑस्ट्रेलिया, चीन व मलेशिया यांची त्रिराष्ट्रीय परिषद नुकतीच येथे झाली. या विमानाचा शोध घेण्यासाठी नवीन सोनार उपकरणे मिळण्यास दोन महिने लागतील व त्यानंतर हा शोध अधिक प्रभावीपणे घेता येईल असे अधिकाऱ्यांनी या वेळी सांगितले.
ऑस्ट्रेलियाचे उपपंतप्रधान वॉरेन ट्रस व शोधमोहिमेचे समन्वयक अ‍ॅनगस हॉस्टन, मलेशियाचे संरक्षणमंत्री हिशामुद्दीन हुसेन व चीनचे वाहतूकमंत्री यांग चुआनतंग या बैठकीस उपस्थित होते. त्यांनी विमानाचा शोध घेण्याबाबत पुढचा कार्यक्रम ठरवण्यासाठी विचारविनिमय केला.  
ट्रस यांनी असे सांगितले, की विमानाचा शोध घेण्याचे ठिकाण नकाशांकित नसून ते अनेक किलोमीटर खोलीवर आहे, त्यामुळे या विमानाचा शोध नव्याने घेण्यासाठी दोन महिने लागतील. सागरतळाचा शोध घेणारी नवीन यंत्रे खरेदी करण्यासाठी निविदा काढण्यात आल्या असून, अशी फार थोडी यंत्रे जगात आहेत जी इतके खोलवर जाऊन विमानाचा शोध घेऊ शकतील व ती खासगी क्षेत्रात उपलब्ध आहेत.
काही देशांकडे मात्र सागराच्या खोलीचा अंदाज घेऊन नकाशा तयार करू शकतील अशी महासागरी वाहने आहेत व त्यांचीही मदत घेतली जाईल. असे असले तरी हंगामी काळात ब्लूफिन- २१ ही अमेरिकी पाणबुडी सागरात शोध घेत आहे.
हॉस्टन यांनी सांगितले, की ४६ लाख चौरस किलोमीटर क्षेत्रातील माहिती गोळा करण्यात आली आहे. आतापर्यंत जो शोध घेण्यात आला त्यात कुठल्याही प्रकारच्या त्रुटी आढळलेल्या नाहीत. बीजिंगकडे जाणारे बोइंग ७७७-२०० विमान ८ मार्चला क्वालालंपूर येथून निघाल्यानंतर बेपत्ता झाले होते ते अजून सापडलेले नाही.