नोटाबंदीच्या निर्णयात जाहीरपणे पंतप्रधान नरेंद्र मोदींची साथ देणारे योगगुरु रामदेवबाबा यांनी आता दोन हजार रुपयाच्या नोटेला विरोध दर्शवला आहे. दोन हजारची नोट अर्थव्यवस्थेला उपयुक्त नसून यामुळे भ्रष्टाचाराला चालना मिळेल अशी भीती रामदेवबाबा यांनी व्यक्त केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या वर्षी ८ नोव्हेंबररोजी नोटाबंदीचा निर्णय जाहीर केला होता. पाचशे आणि हजारच्या नोटा रद्द करुन मोदींनी पाचशेची नवीन नोट आणि दोन हजारची नोट बाजारात आणली होती. यावर योगगुरु रामदेवबाबा यांनी नाराजी व्यक्त केली आहे. दोन हजारची नोट आणण्याचा निर्णय मला पटला नाही. यामुळे भ्रष्टाचाराला चालना मिळेल अशी भीती त्यांनी व्यक्त केली. नर्मदा सेवा यात्रेसाठी मध्यप्रदेशमध्ये दाखल झालेल्या रामदेवबाबा यांनी भोपाळमध्ये स्वदेशीवरुन केंद्र शरकारच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली आहे. केंद्रामधील सरकार स्वदेशीला प्रोत्साहन देत नाही. प्रत्येक सरकार फक्त विदेशी कंपन्यांनाच प्रोत्साहन देते अशा शब्दात त्यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला.

नोटाबंदीमुळे देशात काळा पैशावर चाप बसला आहे. पण आता विदेशातील बँकांमध्ये जमा झालेल्या काळा पैशावर चाप लावणे गरजेचे आहे. केंद्र सरकार यासाठीही कारवाई करेल अशी आशा त्यांनी व्यक्त केली. मोदी सरकारने तीन वर्ष पूर्ण केली आहेत. तर आता आणखी दोन वर्षांचा कालावधी शिल्लक आहे. पंतप्रधानपद हे शक्तिशाली असते आणि ते काहीही करु शकतात याकडेही रामदेवबाबा यांनी लक्ष वेधले आहे. काँग्रेसने देशात काही चांगले केले तर भविष्यात त्यांचेही समर्थन करु. देश हा सर्वांसाठी आहे आणि प्रत्येकाने यासाठी चांगले काम केले पाहिजे असेही त्यांनी सांगितले. २०१४ मध्ये राजकीय संकट असल्याने मी मोदींना पाठिंबा दिला होता. सध्या नवीन राजकीय पक्ष स्थापन करण्याचा माझा कोणताही इरादा नाही असे रामदेवबाबा यांनी स्पष्ट केले.