केप कॅनव्हरॉल : निओवाइज हा धूमकेतू पृथ्वीच्या जवळ येतअसून तो रात्रीच्या वेळी विलोभनीय दर्शन देत आहे. त्याची शेपटी पिसाऱ्यासारखी आहे.जुलैत महिनाभर तो भारतातून सूर्यास्तानंतर दिसणार आहे. या धूमेकतूला दोन शेपटय़ा आहेत.  उत्तर अर्धगोलार्धात हा धूमकेतू दिसत असून तो गेल्या आठवडय़ात बुध ग्रहाच्या कक्षेत होता. तो सूर्याच्या खूप जवळ असल्याने त्याची शेपटी पिसाऱ्यासारखी दिसत आहे, त्यात धूळ व बर्फाचे कण असतात. आता तो दोन आठवडय़ात पृथ्वीच्या आणखी जवळ येणार आहे. नासाने निओवाइज धूमकेतू मार्चमध्ये अवरक्त अवकाश दुर्बिणीने शोधला होता. या धूमकेतूची जाडी ५ किलोमीटर आहे. त्याचे केंद्रक काजळीसदृश पदार्थाचे असून हा धूमकेतू सौरमालेच्या ४.६ अब्ज वर्षांपूर्वीच्या जन्माशी नाते सांगणारा आहे. ऑगस्टपर्यंत हा धूमकेतू दर्शन देणार आहे. प्रकाशाचे प्रदूषण नसेल तर तो नुसत्या डोळ्यांनी दिसतो. अवकाश स्थानकातून अवकाशवीरांनी या धूमकेतूची छबी टिपली आहे.