नोएडा येथे आधार कार्ड नसल्याने दिल्लीमधील सरकारी रुग्णालयाने एका नऊ वर्षाच्या मुलीवर उपचार करण्यास नकार दिल्याची घटना समोर आली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री जे पी नड्डा यांनी मध्यस्थी केल्यानंतर मुलीला सफदरजंग रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. भाजपा नेते मनोज तिवारी यांनी ट्विट करत ही घटना उघडकीस आणली होती. यावेळी त्यांनी दिल्ली सरकारवर ताशेरे ओढले होते.

‘केजरीवाल तुम्ही देशाच्या राजधानीचं विभाजन का करत आहात…जे पी नड्डाजी जर या मुलीला उपचार मिळाले तर नवरात्रीत यापेक्षा अजून चांगली गोष्ट होऊ शकत नाही’, असं मनोज तिवारी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं होतं. काही तासांनी जे पी नड्डा यांनी ट्विटला उत्तर देत मुलीला सफदरजंग रुग्णालयात दाखल करण्यात आलं असल्याची माहिती दिली.

‘मुलीला सफदरजंग रुग्णालयात आणलं आहे. संबधित डॉक्टर तिच्यावरील उपचार करतील. देवी जदगंबेकडे मुलीच्या दीर्घ आयुष्यासाठी प्रार्थना करतो’, असं ट्विट जे पी नड्डा यांनी केलं.

मिळालेल्या माहितीनुसार, नऊ वर्षाच्या प्रियाला नोएडा येथील लोक नायक जयप्रकाश नारायण रुग्णालयात फक्त आधार कार्ड नसल्याने उपचार देण्यास नकार देण्यात आला होता. हे सरकारी रुग्णालय आहे. मुलीला गंभीर आजार जडला असून उपचारासाठी सरकारी रुग्णालयात पाठवण्यात आलं होतं. रुग्णालयाने नकार दिल्याने तिला सफदरजंग रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.